असमानतेचा सामना करून अखेर तृतीयपंथी अंजली पाटील यांनी संघर्षाचा शेवट गोड केला !

anjali patil

जळगाव : राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचे गुऱ्हाळ चालू होते. आज दिवसभर निकालाची लगबग सुरु आहे. कुठे भाउ भाऊ एकमेकांच्या विरुद्ध उभा आहेत, कुठे पतीच्या पॅनेल विरुद्ध पत्नीचे पॅनेल उभारले, तर कुठे सासू विरुद्ध सून यांच्यात सामना रंगला असल्याचे पाहायला मिळाले होते. ग्रामपंचायत निवडणुकांनंतर लागणाऱ्या निकालांवरून राज्यात सर्वत्र राजकीय चर्चांना उधाण आल्याच पहायला मिळतंय. याच कोलाहलात निवडणुकीच्या माध्यमातून असमानतेला आव्हान देणाऱ्या अंजली पाटील यांच्या यशाचा आढावा घेणे गरजेचे आहे.

जळगावच्या भादली बुद्रुक गावातील अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराला नावासमोर लिंगाचा उल्लेख केला होता. यामुळेच त्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी विरोध केला गेला होता. स्वतंत्र भारतात लिंगभेदामुळे निवडणुक लढविण्यास विरोध होणार असेल तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे. अंजली यांना निवडणूक लढविण्याअगोदर असमानतेशी लढावं लागल होतं. अखेर अंजली पाटील यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. औरंगाबाद न्यायालयाने अंजली पाटील यांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला यामुळेच निकालाआधी अंजली पाटील यांनी असमानतेवर विजय मिळवत आदर्श निर्माण केला.

अंजली यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाला आहे. भादली बुद्रूकच्या गावकऱ्यांच्या या निर्णयाचं खरंच स्वागत करायला हवं. कारण तृतीयपंथींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. त्यांच्याकडेही जबाबदारी दिली तर ते नक्कीच लोककल्याणाची कामे करुन दाखवतील, असा विश्वास खेडेगावातल्या गावकऱ्यांनी दाखवला आहे. तृतीयपंथी देखील आपल्या समाजाचा भाग असून त्यांना देखील सर्वांप्रमाणे वागणूक व अधिकार मिळणं गरजेचं आहे. म्हणूनच अंजली या न खचता निवडणुकीला सामोऱ्या गेल्या. त्यामुळेच त्यांना एक वेगळा इतिहास घडवता आला. जळगाव जिल्ह्यातील त्या पहिल्या तृतीयपंथी विजयी उमेदवार ठरल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या