Facebook- अबब…फेसबुकचे दोन अब्ज युजर्स !

फेसबुकचे तब्बल दोन अब्ज सक्रीय युजर्स झाले असून हा टप्पा गाठणारी ही जगातील पहिली वेबसाईट बनली आहे.

फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आता आपल्या सोशल नेटवर्कींग साईटचे दोन अब्ज (२०० कोटी) युजर्स झाले असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले आहे. यात नित्यनेमाने लॉगीन करून फेसबुकचा वापर करणार्‍यांचा हा आकडा आहे हे विशेष. लक्षणीय बाब म्हणजे दोन अब्ज युजर्सचा टप्पा गाठण्याचा बहुमान जगात सर्वप्रथम फेसबुकनेच पटकावला आहे. या पाठोपाठ दीड अब्ज युजर्ससह युट्युब दुसर्‍या तर १.२ अब्ज युजर्स असणारे व्हाटसअ‍ॅप व फेसबुक मॅसेंजर हे तिसर्‍या/चौथ्या क्रमांकावर आहे. फेसबुकचीच मालकी असणारे इन्स्टाग्राम हे अ‍ॅपही एक अब्ज युजर्सच्या उंबरठ्यावर उभे आहे. अर्थात फेसबुकसह याच समूहातील व्हाटसअ‍ॅप, मॅसेंजर आणि इन्टाग्रामला जगभरात उदंड प्रतिसाद लाभल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे गुगल सर्चसह जी-मेल, युट्युब आदींनाही एक अब्जांच्या पलीकडे पसंती मिळाली आहे. मात्र फेसबुकने मारलेली जोरदार मुसंडी ही गुगलला धडकी भरविणारी आहे हे निश्‍चित.

दरम्यान, हा ऐतिहासिक टप्पा गाठल्याबद्दल फेसबुकतर्फे जोरदार सेलीब्रेशन केले जात आहे. यासाठी युजर्सला त्याच्या लाईक, कॉमेंट व शेअरवर आधारित कस्टमाईज्ड व्हिडीओ निर्मित करून तो शेअर करण्याची सुविधा देण्यात येत आहे. यासोबत प्रत्येक युजर फेसबुकचा नेमका कसा वापर करत आहे? याची माहिती https://www.facebook.com/goodaddsup या संकेतस्थळावरून मिळणार आहे.