भाविकांच्या मिनी बसला पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर अपघात

पुणे : देवदर्शनाकरिता निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात सोळा जण जखमी झाले आहेत. आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उर्से टोलनाक्याजवळ ओझर्डे या गावाच्या हद्दीत सदर अपघात झाला. जखमींपैकी आठ जण हे गंभीर तर आठ जण किरकोळ स्वरूपाचे जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तुषार टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीची मिनी बस क्र. (MH 04 GP 1690) ही ठाण्याहून जेजुरीला प्रवासी घेऊन जात असताना ओझर्डे गावाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकून हा अपघात झाला. अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे देवदूत पथक महामार्ग पोलीस व खासगी रुग्णवाहिकांमधून जखमींना रुग्णालयात उपचाराकरिता पाठविण्यात आले.