मुठा कालवा फुटण्याचा भूमिगत वीजवाहिन्यांशी संबंध नाही, महावितरणचे स्पष्टीकरण

पुणे : सिंहगड रस्त्यावर मुठा उजवा कालवा फुटण्यास कालव्याबाहेरील भिंतीबाजूला दोन वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांचा संबंध नसल्याचे महावितरणकडून शुक्रवारी (दि. 28) स्पष्ट करण्यात आले.

दांडेकर पुलाजवळ गुरुवारी (दि. 27) मुठा उजवा कालवा सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटला. तेथे इतर खासगी कंपन्यांच्या केबल्स तसेच महावितरणच्या वीजवाहिन्या दिसून आल्यामुळे कालवा फुटण्यास केबल खोदाई कारणीभूत असल्याची शंका व्यक्त झाली. मात्र या कालव्याच्या बाहेरील भिंतीबाजूला पाच फूट अंतरावर महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वीजवाहिन्यांच्या चार केबल टाकण्यात आल्या आहेत.

सन 2016 मध्ये या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामासाठी पाटबंधारे विभागाकडे रितसर परवानगी घेण्यात आली होती. तसेच आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या देखरेखीखाली तसेच त्यांनी नेमून दिलेल्या जागेत या दोन्ही वीजवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्या वेळी करण्यात आलेली खोदाई ही कालव्याच्या बाहेरील भिंतीपासून पाच फूट अंतरावर असल्याने कालवा फुटण्यासाठी या खोदाईचा कोणताही संबंध नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे भूमिगत वाहिनी असलेला भराव वाहून गेल्यामुळे वाहिन्या उघड्या झालेल्या दिसून येत आहे. मात्र कालवा फुटण्यासाठी या वाहिन्यांच्या खोदाईचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...