शाळा बंद निर्णयावर शिक्षणमंत्र्यांच स्पष्टीकरण

vinod tawade

पुणे : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी शाळा बंद निर्णयावर विधान करतांना नागरिकांच्या शाळा बंद करण्याबाबत प्रामाणिक तक्रारी आल्यास आणि शिक्षणहक्क कायद्याचा (आरटीई) भंग होणार असल्यास शाळा बंद करण्यात येणार नाही असे स्पष्ट केले. राज्यातील तेराशे शाळांमधील ५५७ शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ६० शाळांकडून तक्रारी आल्यामुळे या शाळांबाबत फेरविचार सुरू आहे.

कमी पटसंख्या आणि गुणवत्ता खालावत असल्याने राज्य सरकाने १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तसेच विरोधक सुद्धा या निर्णयाच्या पाठीशी नसून रोष व्यक्त करीत आहेत. या सर प्रकरणावर बोलतांना तावडे म्हणाले,‘राज्यातील १३०० शाळा बंद करण्यात येत नसून त्यांचे समायोजन करण्यात येत आहे. एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाहीत. समायोजन होणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय समायोजित शाळेत करण्यात आली आहे. शाळा समायोजनाची प्रक्रिया ही आरटीईनुसार राबविण्यात आली आहे. त्यामुळे ती चुकीची नाही. शालेय शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी ३० पटसंख्या असलेल्या शाळांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश हे सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाठविण्यात आले आहे. विद्यार्थी आणि शाळांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखण्यात येऊ शकतात, याबाबत ते पत्र पाठविण्यात आले आहे. या पटसंख्येच्या शाळांचे समायोजन करण्याचा सरकारचा विचार नाही. भविष्यात ८० हजार शाळा बंद करण्यात येणार नाही.’