दरेकरांच्या विधानाचे स्पष्टीकरण देताना चित्रा वाघ म्हणाल्या, ‘त्यांचे’ थोबाड रंगवायला हवे

chitra wagh vs darekar

मुंबई : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या धोरणांवर टीका करताना प्रविण दरेकर यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर वाद निर्माण झाला. काल शिरुरमध्ये प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले. राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. ज्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने दरेकर यांच्यावर हल्लाबोल केला असून माफी मागितली नाही तर गाल लाल करण्यात येईल असा आक्रमक इशारा देखील देण्यात येत आहे. आता भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या टीकांचा चांगलाच समाचार घेतला असून दरेकर यांच्या विधानाचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं आहे. ‘प्रवीण दरेकर यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आलाय. ते शिरूरला राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमाला गेले होते. रामोशी समाजाचा तिथे मोठा मेळावा होता. सरकारने त्यांना काही आश्वासन दिले होते, ते आजही त्यांनी पूर्ण केलेले नाही. त्यांना त्याचा विसर पडला असेल,’ असं त्यांनी म्हटलं.

यासोबतच, ‘रामोशी आणि कष्टकरी समाजाला भाजप हा पक्ष जवळचा वाटतो. कारण भाजप पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तत्वांवर चालतो. समाजातील शेवटचा उपेक्षित जो घटक आहे त्यांच्यापर्यंत भाजप जातो. याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा धनदांडग्यांचा, कारखानदारांचा, प्रस्थापितांचा म्हणजेच रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असा त्याचा संदर्भ आहे,’ असं स्पष्टीकरण वाघ यांनी दिलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या, ‘यशवंतरावांचा वारसा असल्याचं जे म्हणतात त्यांनी रामोशी समाजाबाबत काहीच केलेलं नाही. त्यामुळे त्यांना या टीका बोचतात. त्यामुळे कोणी म्हणाले थोबाड रंगवायला पाहिजे, फोडायला पाहिजे. हो नक्की फोडायला पाहिजे, पण बलात्काऱ्यांचे फोडायला पाहिजे. जे लोक तुमच्यासोबत आहेत, ज्यांच्यवर एफआयआर आहेत त्यांचे थोबाड रंगवायला हवे,’ असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या