संदीप कापडे | मोठी प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून (Andheri East Election) भाजपने माघार घेतली आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरेपर्यंत मोठे राजकारण पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमदेवार व दिवगंत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा अर्ज भरेपर्यंत त्यांना त्रास देण्यात आला. महापालिकेने त्यांचा सेवेतील राजीनामा अर्ज रोखून ठेवला होता. शेवटी ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे न्याय मागितला. नंतर न्यायालयाने मुंबई महापालिकेला (Mumbai Municipality) फटकारत लटके यांचा अर्ज मंजूर करण्याचे आदेश दिले. हे सर्व भाजपमुळे झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. भाजपने देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धडा शिकवण्यासाठी द्वेषाचे राजकारण करत या निवडणुकीत उमेदवार दिला. मुरजी पटेल (Murji Patel) यांना भाजपने उमेदवारी दिली. भाजपने दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत पटेल यांचा अर्ज देखील दाखल केला. मात्र आज भाजपने अर्ज मागे घेतल्याची घोषणा केली. भाजपला निवडणुकीत पराभव दिसला का?, उद्धव ठाकरेंना खरचं सहानुभूती मिळत आहे का, नेमके राजकारणाचे फासे कसे पलटले की भाजपला माघार घ्यावी लागली. हे जाणून घेऊया.
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अंधेरी पूर्व मतदार संघ (Andheri East Constituency) आधी शिवसेनेच्या ताब्यात होता. दिवंगत रमेश लटके (Ramesh Latke) हे शिवसेनेचे आमदार होते. आता त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) निवडणूक लढवत आहेत. साध्या लिपीक पदाच्या राजीनाम्यासाठी त्यांना राजकीय दबावापोटी मोठा संघर्ष करावा लागला. शेवटी न्यायालयाने बीएमसीला खडसावत ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला. महाराष्ट्रात आतापर्यंत अशा निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला आणि पोटनिवडणूक झाली जर त्यांच्या घरचा सदस्य उभा असले. तर महाराष्ट्रात निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. मात्र ही राज्याची निवडणूक असल्याचे वातावरण भाजपने तयार होते.
भाजपची अचानक माघार का?
उद्धव ठाकरे यांच्याप्रती राज्यात सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे चित्र आहे. आधी भाजपने उमेदवार द्यायला नको होता. पण शिवसेना फोडल्यानंतर देखील भाजप शांत बसला नाही. कारण अंधेरी पूर्व निवडणुकीत भाजपचा विरोधी उमेदवार ऋतुजा लटके नव्हत्या तर उद्धव ठाकरे होते. तसे चित्र देखील निर्माण करण्यात आले होते. मतदारसंघात ऋतुजा लटके यांना सहानुभूती होती तसेच जनतेचा मोठा पाठींबा होता. रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर भावनिक दृष्ट्या देखील मतदार लटके परिवारासोबत जोडला गेला. त्यामुळे भाजपचा पराभव निश्चित होता. तसेच भाजपने उमेदवारी दिलेले मुरजी पटेल यांना यापूर्वी देखील अंधेरीच्या जनतेने नाकारले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद देखील गेले आहे. स्थानिक पातळीवर देखील भाजपमधून त्यांना विरोध होता. पण पटेल आशिष शेलार यांच्या जवळचे असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसेच या निवडणुकीत पराभव झाला तर आगामी मुंबईसह अन्य महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपला मोठा फटका बसला असता. शिवसेना फोडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे भाजप – शिंदे गटासाठी ही अस्तित्वाची लढाई होती. ही अहंकाराची देखील लढाई होती. मात्र भाजप-शिंदे गाटाने ही लढाई न लढता हार पत्करली.
राज ठाकरेंची भाजपशाही?
भाजपने निवडणुकीत पराभव दिसल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहायला लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले. यावेळी त्यांनी यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीचे संदर्भ दिले. राज ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. मात्र एक प्रश्न असा निर्माण होतो की हे सगळं महापालिकेच्या राजीनाम्यावरुन घोळ झाला तेव्हा का नाही सुचलं?. तेव्हा राज ठाकरे यांनी विरोध का नाही केला. पत्राद्वारे राजीनामा स्विकारण्यासाठी आवाहन का नाही केले. हे सर्व सुडाचे राजकारण आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित होते. मग राज ठाकरे, शरद पवार तेव्हा गप्प का होते. त्यांनी आवाज का नाही उठवला, असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला आहे.
उद्धव ठाकरेंचा द्वेष का?
भाजपने अडीच वर्ष मुख्यमंत्री पद नाकारल्याचे सांगत २०१९ ला शिवसेनेने महाविकास आघाडीच्या पाठींब्याने सरकार स्थापन केले. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांसोबत सकाळचा शपथविधी फसला होता. यामुळे भाजपला राज्यात नाही तर देशात तोंडावर पडावे लागेल होते. हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्राला माहित आहे. तेव्हापासून भाजप शिवसेनेवर लक्ष ठेऊन होते. संधी मिळताच भाजपने शिवसेनेवर हल्ला केला आणि शिवसेनेचे ४० आमदार फोडले. यामुळे सेनेचा वेगळा ‘शिंदे गट’ निर्माण झाला. त्यांनी संपूर्ण शिवसेनेवर आपला दावा सांगितला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिंदे गटासोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह देखील गोठवले गेले. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का होता. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मात देण्यासाठी भाजपने अंधेरी पूर्व मतदार संघात उमेदवार दिला होता.
उद्धव ठाकरेंना खरचं सहानुभूती मिळत आहे का?
उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी भाजप हे राजकारण करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे महत्वाची भूमिका बजावत होते. एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर करुन शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. हे सर्व राजकारण महाराष्ट्राच्या समोर आहे. राज ठाकरे आणि भाजपने कितीही विरोध केला तरी उद्धव ठाकरे यांना भाजपच्या सुडाच्या राजकारणामुळे सहानुभूती मिळत आहे. जे लोक राजकारणापासून दुर आहेत. त्यांच्या व्हाट्सअप स्टेटसला देखील उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. ही ग्रांऊड रिअॅलिटी आहे. याचा फटका भाजपला नक्की बसेल.
महत्वाच्या बातम्या :
- Upcoming Car Launch | नवी कार घेण्याचा विचार करत असला, तर ‘या’ नवीन लाँच होणाऱ्या कारवर एकदा टाका नजर
- NCP । “भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण”; भाजपच्या माघारीनंतर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
- Diwali Cleaning Tips | दिवाळीसाठी घरातील पडदे साफ करण्यासाठी येत आहे प्रॉब्लेम? तर ‘या’ टीप्स करा फॉलो
- Sushma Andhare | “प्रकाश आंबेडकरांनी मला ओळखायला मी काय…”, सुषमा अंधारेंचा पलटवार
- Breaking News । मोठी बातमी! अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपची माघार