खळबळजनक! उस्मानाबाद येथे एका खासगी दवाखान्यासमोर पाच तास कोरोना रुग्णाचा मृतदेह पडून!

उस्मानाबाद: जिल्ह्यातील तेर येथे खाजगी दवाखान्यासमोर एका ६५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा मृतदेह बेवारस अवस्थेत तब्बल पाच तास उघड्यावर पडून होता. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. नातेवाईकांना ना वाहन मिळाले ना प्रशासनाचे सहकार्य, किणी येथील ६५ वर्षीय वृद्ध सोमवारी (दि.३) सकाळी तेर येथील बसस्थानकाजवळील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी आले होते. यावेळी या दवाखान्यातील डॉक्टरांनी त्या रूग्णाची तपासणी करून त्यांना शासकीय रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. संबंधित रूग्ण हा दवाखान्या बाहेर येत असतानाच दवाखान्याच्या दरवाज्या समोर कोसळून पडला. यावेळी त्या रूग्णाचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती ढोकी पोलिसांना देण्यात आली. यावेळी पोलीस पंचनाम्यानंतर या रूग्णाची तेरच्या ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी खाजगी दवाखान्यासमोर रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली.

दरम्यान, त्यात त्या रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. विशेष म्हणजे त्या रूग्णाच्या मृत्युनंतर व कोरोनाच्या टेस्टनंतर तब्बल पाच तास त्यांचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडून होता. त्यामुळे नागरिकांसह नातेवाईकांमधून प्रशासकीय यंत्रणेच्या नियोजन शुन्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. यावेळी दोन वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांच्या मदतीने तेर ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह कीट मध्ये घातला. हा सर्व प्रकार पाच तासापासून सुरु होता. दरम्यान एवढ्यावरच ही मृतदेहाची हेळसांड थांबली नाही. यावेळी मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांना साधे वाहन सुध्दा लवकर मिळाले नाही. शेवटी तेर ग्रामपंचायतच्या घंटागाडीत हा मृतदेह किणी येथे पाठविण्यात आला. तब्बल पाच तासापर्यंत हा किळसवाणा प्रकार चालूच होता. शेवटी मृतदेह किणी ग्रामपंचायतच्या ताब्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी देण्यात आला व त्यानंतर रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकारामुळे नागरिकांसह नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे आजच्या या दुर्दैवी घटनेवरुन आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत व इतर प्रशासकीय यंत्रणेचा गावातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी किती प्रामणिक प्रयत्न होत आहे हे चांगलेच समोर आले आहे. मात्र त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या