माजी आमदार राजीव राजळे यांचे दुःखद निधन

rajeev rajale

अहमदनगर : पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे यांचे शनिवारी रात्री साडे अकरा च्या सुमारास निधन झाले. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज दुपारी ४:३० वाजता पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

राजीव राजळे यांनी युवक काँग्रेस मधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरवात केली होती. ते 2004 ते 2009 मध्ये पाथर्डी-शेवगाव या मतदार संघातून काँग्रेस चे आमदार म्हणून निवडून आले होते. राजीव राजळे हे आपल्या अभ्यासू आणि आक्रमक भाषणामुळे राज्यभर प्रसिद्ध होते.

राजीव राजळे यांना त्यांच्या कार्यामुळे प्रा. मधू दंडवते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार देखील मिळाला होता. पुढे राजळे यांनी 2014 साली अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचे ते पती होते. तर राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे होते. तालुक्यातील विविध संस्था, संघटना यावर ते कार्यरत होते. आशा या तरुण हरहुन्नरी आणि कार्यतत्पर नेत्याच्या जाण्याने जिल्ह्याच्या सामाजिक कार्यात एक भरून न काढता येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक थरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.