शिवसेनेला मोठा धक्का ; माजी आमदार धनराज महाले राष्ट्रवादीच्या गळाला

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना फोडा फोडीच्या राजकारणाला सुरवात झाली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दिंडोरी मतदारसंघात हरिश्चंद्र चव्हाण खासदार आहेत. सेना-भाजपा युतीचे संकेत असून, हा मतदारसंघ भाजपाला जाण्याच्या शक्यतेने त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने दिंडोरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली असून, गेल्या वेळी मोदी लाटेतही प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात दोन हात करण्याची तयारी दाखविणार्या डॉ. भारती पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. पवार नाराज असल्याचे बोलले जात असून, त्या ऐनवेळी कोणताही निर्णय घेऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आकारास येत असलेली समीकरणे बघून इच्छुकांच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत. शिवसेनेचे माजी आमदार तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धनराज महाले यांनी ‘निर्धार परिवर्तनाचा’ यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाले हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. पण, पुढील गणित सेना-भाजपा युतीवर अवलंबून आहे. युती झाल्यास जागावाटपात हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला जाऊ शकतो. कारण, हरिश्चंद्र चव्हाण यांच्या रूपाने भाजपाचा विद्यमान खासदार या मतदारसंघात आहे. काही दिवसांपूर्वी युतीबाबत संभ्रमावस्था होती. आता मात्र युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहे. नेमके हेच ओळखून महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.