बबनराव पाचपुते यांचा भाजपावरच हल्लाबोल, मंत्रीमंडळाच्या कामकाजावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह ?

अहमदनगर/प्रशांत झावरे : भाजपा नेते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अहमदनगर येथे बोलताना भाजपाच्याच कार्यपद्धतीवरच टीका केल्याने नेत्यांच्या बरोबर कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला. पाचपुते यांनी मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या नेत्यांना पण टोमणे मारताना, पक्षाध्यक्ष कार्यकर्त्यांना वेळ देत नसून, मंत्र्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणे घेणे नसल्याचे सांगितले. मंत्रिमंडळात नेते फक्त पदासाठी आहेत, बाकी जनता वाऱ्यावर आहे असा हल्लाबोल बबनराव पाचपुते यांनी भाजपावरच केल्याने ते नक्की भाजपा मध्येच आहेत का असा प्रश्न कार्यकर्त्याना व भाजपा नेत्यांना पडला.

भाजपाची सत्ता केंद्रात व राज्यात दोनही ठिकाणी आहे, परंतु केंद्रातील मंत्री जिल्ह्यात येतात, आणि राज्यातील मंत्र्यांना यायला वेळ नाही, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी जर मंत्रिमंडळ वेळ काढत असेल तर मग सत्ता काय कामाची, प्रदेशाध्यक्ष कार्यकर्त्याना भेटत नाहीत, नेते कायम संपर्काच्या बाहेर असतात मग जनतेने कोणाकडे पहायचे आणि अशी सत्ता काय कामाची असा परखड सवाल बबनराव पाचपुते यांनी सर्वांपुढे व्यक्त केल्याने उपस्थित भाजपा नेत्यांबरोबर कार्यकर्तेही अवाक होऊन पाहत राहिले. तसेच यापुढेही असेच चालणार असेल तर जनता आपल्याला माफ करणार नाही अशी खंत बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केली. यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच लक्ष घातले नाही तर वेळ निघून जाईल असा सल्ला पण त्यांनी नेत्यांना दिला.

आजही अहमदनगर मधील पक्षाने मेळाव्याची वेळ सकाळी ११ वाजल्याची परंतु चक्क ४ तास उशिरा मेळावा सुरू झाला आहे. यावरून भाजपा पक्षात अजिबात शिस्त दिसत नसल्याचे स्पष्ट होत आहे, आणि यावर अंकुश पण ठेवायला कोणीही नाही. कोणीही कोणाचे ऐकत नाही, हे वागणे म्हणजे पक्ष शिस्तीचा भंग असल्याचे पाचपुते म्हणाले. केवळ कागदावर आपण सरकार स्थापन करू असे म्हणण्यापेक्षा प्रत्येक्ष लोकांमध्ये जाऊन काम केले तरच आपण निवडून येऊ नाहीतर गुलाल मिळण्याऐवजी बुक्का मिळेल असा टोला त्यानाई पक्षाच्या नेत्यांना हाणला. पक्षात सध्या मरगळ आलेली असून पक्षाने दिलेली शिस्त पाळायला हवी तरच भविष्यात चांगले दिवस येतील आणि लोक आपल्याला स्वीकारतील नाहीतर घरी बसावे लागेल असे पाचपुते म्हणाले.

बबनराव पाचपुते पुढे म्हणाले की, मी श्रीगोंदा तालुक्यातील अनेक प्रश्न मंत्रालयात नेऊन मांडले पण त्यावर काहीच तोडगा काढला नाही, कामाच्या नावाने शून्य अशी माझ्या तालुक्याची अवस्था झाली आहे, श्रीगोंदयासाठी मी ५०० मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून पाठवला होता, परंतु त्याला साधे उत्तर पण सरकारने दिले नाही. तो प्रस्ताव मंजूर झाला असता तर श्रीगोंदा तालुक्याचा वीज प्रश्न बऱ्याच प्रमाणात संपला असता. तालुक्यातील गावे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली असती. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्याच पारड्यात मते पडली असती. पण सरकार असूनही जनतेला याचा उपयोग नसेल तर काय करायचे अशी उद्विग्नता पाचपुते यांनी व्यक्त केली. तसेच आता आपणच आपल्या पद्धतीने काम करावे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे, तसे तालुक्यात मी आता लोकांसाठी खूप काम केल्याने मी परत आमदार होणार आहेच, त्यासाठी मी सगळी तयारी केल्याचे पाचपुते म्हणाले व त्यांनी यातून पक्षाला सूचक इशारा पण दिला.

अहमदनगरमधील जनसेवा फौंडेशनने घेतलेल्या डॉ. सुजय विखे यांच्या कार्यक्रमावरही बबनराव पाचपुते यांनी सडकून टीका केली. विखे यांचे नाव न घेता ते म्हणाले, सध्या अहमदनगर जिल्ह्यात दक्षिणेत निरनिराळ्या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे सुरू आहेत. शनिवारी नगरमधील वाडिया पार्कमध्ये मोठा सांस्कृतिक कार्यक्रम झाला, पण या कार्यक्रमाचा उद्देश खरच सांगितल्याप्रमाणे जनसेवाच आहे का दुसरा काही आहे, राजकारणासाठी करत असाल तर खरं सांगा, उगीच ताकाला जावून भांडे लपवायचे कशाला आणि उत्तरेतील नेत्यांनी येऊन आम्हाला दक्षिणेत काही शिकविण्याची गरज आहे असे वाटत नाही, आम्ही संघटितपणे उत्तरेचे आक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जनता दुधखुळी नसून मतदानात हे उत्तर सर्वांना मिळेल, काम कोणालाही नको फक्त खासदार होण्याची स्वप्ने पडत आहेत. यामुळे नगरकरांचे फार मोठे नुकसान होत असून आपण याविरुद्ध आवाज उठवणार असून जनतेच्या भल्यासाठी काम करणार असल्याचे पाचपुते म्हणाले.

You might also like
Comments
Loading...