…तर सरकारची खैर नाही ; अजित पवारांचा भाजप सरकारला सज्जड दम

टीम महाराष्ट्र देशा: या दादागिरी करणाऱ्या सरकारला जागा दाखवायलाच हवी. आम्ही कायदा हातात घेणार नाही पण सरकारने शेतकऱ्यांची वीज तोडण्याचा प्रयत्न केला तर खैर नाही. शेतकरी पैसे बुडवत नाही. अधिकाऱ्यांनीही वीज तोडण्यासाठी जाऊ नये. जर आम्हाला डिवचवलं तर सरकारमधील लोकांना राज्यात फिरू देणार नाही. असा सज्जड दम राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारला दिला आहे. हल्लाबोल यात्रेदरम्यान उस्मानाबाद येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

त्याचप्रमाणे, छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन आहे. महाराष्ट्रासाठी हा सोनेरी दिवस आहे. अशा दिवशी आपल्याला हे हल्लाबोल आंदोलन करावे लागतंय हे आपल्या राज्यासाठी दुर्दैवी आहे.अस देखील ते म्हणाले. तसच भीमा-कोरेगावच्या परिसरात जे काही झाले त्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे? दोन समाजात कोण तेढ निर्माण करत आहे? तरुणांची माथी कोण भडकवत आहे? याचा खुलासा व्हायलाच हवा. अस सुद्धा अजित पवार म्हणाले.

उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा नंतर ही अतिविराट सभा पार पडली. या सभेमध्ये अजित पवार यांनी सरकारला उलथवून टाकण्यासाठी मराठवाडयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देण्याचे आवाहन केले. शिवाय उस्मानाबादमधील जनतेला त्यांनी आवाहन करताना आपल्याला आपलं सरकार आणायचं असून याअगोदर दोन आमदार दिले होते आता तसे नको मला सर्वच आमदार दया अशी मागणी जनतेला केली.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,उस्मानाबादमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार सतीश चव्हाण, अमरसिंह पंडित , विक्रम काळे , जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये, विदया चव्हाण आदींसह मराठवाडयातील सर्व आमदार, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पहा अजित पवारांचे संपूर्ण भाषण