PM Cares Fund सुरू करून मोदींनी ‘सेल्फ प्रमोशन’ करण्याची संधी सोडली नाही – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसचा विळखा वाढत आहे. संपूर्ण जगात भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. चीननंतर आता इटलीआणि स्पेनमधील स्थिती भयावह आहे. यूरोप आणि अमेरिकेतील परिस्थितीही हाताबाहेर जात आहे. भारतात परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याचप्रमाणे विविध घोषणांच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांचा देशाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

देशाला कोरोनाशी लढण्यासाठी मनोबल तर हवंच आहे, पण त्याचबरोबर गरज आहे ती आर्थिक मदतीची. देशातील अनेक मोठ्या उद्योगपतींनी मदतीचा हात पुढे केला आहे. देशात मास्क, सॅनिटायझर आणि व्हेंटिलेटर्सपासून अनेक प्रोटेक्टिव्ह संसाधनांची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM Care Fund ची घोषणा केली, ज्यामध्ये देशातील प्रत्येक नागरिक स्वेच्छेने काही आर्थिक मदत करू शकतो. या योजनेतून 100 कोटी जमा करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अनेक गरजूंसाठी आर्थिक मदत गोळा करण्यात येत आहे.

आता यावरूनच कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. जवाहरलाल नेहरू यांनी जानेवारी १९४८ मध्ये राष्ट्रीय सहाय्यता निधी PM National Relief Fund स्थापन केला. आतापर्यंत एकाही प्रधानमंत्र्यांना नवीन राष्टीय निधी सुरू करण्याची गरज वाटली नाही. पण PM Cares Fund सुरू करून नरेंद्र मोदी यांनी मात्र ‘सेल्फ प्रमोशन’ करण्याची संधी सोडली नाही. असा घणाघात चव्हाण यांनी केला आहे. आता याला भाजपकडून कस उत्तर मिळतंय याकडे सगळ्यांचच लक्ष लागल आहे.