आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती? सुषमा स्वराज म्हणतात ही तर केवळ अफवा

टीम महाराष्ट्र देशा :आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरु असतानाच सुषमा स्वराज यांनी त्यासंदर्भात वक्तव्य केले आहे. मी आंध्र प्रदेशची राज्यपाल झाले या बातमीत कुठलेच तथ्य नाही. असे सुषमा स्वराज यांनी म्हंटले आहे.

३० तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींच्या २०१४ च्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालय सांभाळले होते. मात्र यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आले नाही. दरम्यान, सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याची चर्चासुरु झाली होती.

इतकेच नव्हे तर, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि माझ्या ताई, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या आंध्र प्रदेशच्या राजपाल झाल्या, त्यासाठी त्यांना शुभेच्छा, अशा आशयाचे ट्वीटही केले होते. मात्र काही वेळाने ते काढूनही टाकले होते.

याचदरम्यान, या सर्व चर्चांना सुषमा स्वराज यांनी पूर्णविराम दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार सोडण्यासाठी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी बोलवले होते. मी आंध्र प्रदेशची राज्यपाल झाले या बातमीत कुठलेच तथ्य नाही.” अशा आशयाचे ट्विट सुषमा स्वराज यांनी केले.