fbpx

काकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव निश्चित

पुणे : आपल्या रोकठोक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य संजय काकडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविषयी काकडे यांनी एक भविष्यवाणी केली असून या भविष्यवाणीमुळे दानवे यांची झोप उडण्याची शक्यता आहे.

संजय काकडे हे सध्या भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य आहेत. मागील वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत काकडे यांनी चमत्कार करत भाजपला सत्तास्थानी आणले. काकडे यांनी शुक्रवारी ‘झी २४ तास’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य परिस्थितीवर भाष्य केले.

आम्ही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती न केल्यास भाजपला मोठा फटका बसेल. ४८ पैकी ४० मतदारसंघ तर सोडाच पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना स्वत:च्या मतदारसंघातही जिंकता येणार नाही. त्यांचा दीड-दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य संजय काकडे यांनी केले.

सेनेने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार केला असून भाजपच्या भाजपवर हल्ले चढविण्याचे काम जोरात सुरु आहे. दुसऱ्या बाजूला आघाडी या दोन्ही पक्षांना सत्तेतून दूर करण्यासाठी जोर लावत आहे. काकडे यांनी दानवे यांच्यासंदर्भात जरी भविष्यवाणी केली असली तरी या वक्तव्यातून सेनेचं महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.