भारतीय वैज्ञानिकांच्या हाती लागला संसाधनांचा मुबलक साठा 

सागरी भागात लाखो टन धातू आणि खनिजे असल्याचे सापडले पुरावे  

वेबटीम : भारतीय भूगर्भशास्त्र संस्थेच्या वैज्ञानिकांना देशाच्या आसपास असलेल्या सागरी भागात लाखो टन धातू आणि खनिजे असल्याचे पुरावे सापडले आहेत. चेन्नई, अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप जवळील भागांमध्ये भूगर्भशास्त्र संस्थेच्या वैज्ञानिकांना नैसर्गिक संसाधने असल्याचे पुरावे आढळले आहेत. सर्वप्रथम २०१४ मध्ये भारतीय वैज्ञानिकांना या भागात नैसर्गिक संसाधने असल्याचा अंदाज आला होता. यानंतर भारतीय वैज्ञानिकांकडून या भागात अधिक संशोधन करण्यात आले.
   वैज्ञानिकांना समुद्रात चुनखडकाचा चिखल, फॉस्फेटयुक्त हायड्रोकार्बनसारखे पदार्थ सापडले आहेत. या वस्तू अतिशय मोठ्या प्रमाणात सापडल्याने या भागात मुबलक नैसर्गिक संसाधने असावीत, असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. वैज्ञानिकांचा अंदाज खरा ठरल्यास या भागातून भारताला मोठ्या प्रमाणात संसाधने हाती लागू शकतात. तीन वर्षांच्या संशोधनानंतर भारतीय भूगर्भशास्त्र संस्थेच्या वैज्ञानिकांनी १ लाख ८१ हजार २५ चौरस किलोमीटर भागाचा डेटा तयार केला आहे. या भागात १० हजार मिलियन टन चुनखडकाचा चिखल असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात अधिक संशोधन केल्यास संसाधनांचा मुबलक साठा वैज्ञानिकांच्या हाती लागू शकतो.
कारवार, मंगळुरु आणि चेन्नईच्या किनाऱ्यांवर फॉस्फेटचा गाळ सापडल्याची माहिती भारतीय भूगर्भशास्त्र संस्थेने दिली आहे. याशिवाय वैज्ञानिकांना तमिळनाडूच्या किनारी भागातील मन्नारजवळ गॅस हायड्रेट आणि अंदमानच्या समुद्राजवळ कोबाल्टचे तुकडे आढळून आले आहेत. तर लक्षद्वीपच्या समुद्राजवळ मँगनीज असल्याचे पुरावे सापडले आहेत. या भागात अधिक संशोधन करण्याची जबाबदारी समुद्र रत्नाकर, समुद्र कौस्तुभ आणि समुद्र सौदीकामा या बोटींवरील कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.
You might also like
Comments
Loading...