‘हमारे इधर सब चालू है बरं का!’, आघाडीच्या ‘बंद’ची सदाभाऊंनी उडविली खिल्ली

सांगली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारामध्ये शेतकऱ्यांची चिरडून हत्या करण्यात आली. ज्यानंतर देशभरातून तीव्र नाराजीचा सूर आळवण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र बंद पाळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहेत. क्वचित ठिकाणीच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मुंबईत बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले जात आहे. तर बेस्टच्या बसेसवरही दगडफेक झाल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी मात्र या महाराष्ट्र बंदची खिल्ली उडवली आहे. ‘महाराष्ट्र म्हणजे मुंबई फक्त! होऊ द्या समाधान!! हमारे इधर सब चालू है बरं का’ असे ट्विट करत सांगली जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, बंद असल्यामुळे रस्त्यांवर नागरिकांची संख्या कमी दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हत्येचा निषेध झाला पाहिजे पण हिंसेच्या मार्गानं नको अशी मागणी सर्वसामान्यांनी केली आहे. तर, बंदचा मार्ग योग्य असून हा बंद यशस्वी झालाच पाहिजे असं म्हणज शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ अनेकांनीच सूर आळवला आहे. बंदची हाक दिल्यानंतर राज्यात काही ठिकाणी महाविकास आघाडीकडून दुकानं बंद करण्यासाठी सक्ती करण्यात येतानाचं चित्र राज्यातील काही भागांत दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या