‘पूर्वी ‘अब्बाजान’ म्हणणारे सर्वजण गरिबांचे रेशन हडपायचे’, योगींचा काँग्रेस, समाजवादीला टोला

yogi adityanath

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. भाजपा नेते विरोधी पक्षांवर टीका करण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत. उत्तरप्रदेशमधील कुशीनगरमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते एका विकासकामाचे उद्घाटन झाले. यावेळी योगींनी काँग्रेससह विरोधकांना चांगलेच झोडपले.

‘रोगराई, बेरोजगारी, माफियाराज आणि भ्रष्टाचार वगळता, काँग्रेस, सपा आणि बसपा सरकारांनी उत्तर प्रदेशाला काय दिले? पण आता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, विभाजनाच्या राजकारणाला स्थान नाही. २०१७ पूर्वी प्रत्येकाला रेशन मिळत होते का? पूर्वी जे ‘अब्बाजान’ म्हणत असत त्यांनी गरिबांचे रेशन पचवले अशी टीका योगींनी केली.

‘समाजवादी पक्षाचे सरकार गरिबांचे रेशन खाते व त्यांना मरू देते. अब्बाजान म्हणणाऱ्या एका समुदायास फायदा पोहोचवत होते. २०१७ च्या अगोदर गरिबांना रेशन का नव्हते मिळत? कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरिबांचे रेशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते व त्यांचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहचत होतं. आज गरिबाचं रेशन कुणीच नाही घेऊ शकत, घेतलं तर तुरूंगात नक्कीच जाईल’ असे योगी म्हणाले.

तसेच ‘काँग्रेस देशातील लोकांना रोग देतंय. ते रामार विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांचा अवमान करून माफियांचे संरक्षण करत आहे. याउलट भाजप नागरिकांना बरे करतो. आम्ही प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करतो आणि माफियांना त्यांची जागा दाखवतोय. भाजप आहे तिथे प्रत्येकासाठी आदर आहे असे योगी म्हणाले.

कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद केले
या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी कोरोना विरोधात युपीने लढा देत विजय मिळवल्याचा दावा केला. ‘देशातील इतर राज्यांची सरकारं कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. पण आम्ही तर कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद करुन टाकलं आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान केलेलं असलं तरी आम्ही केंद्र सरकारच्या साथीनं जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचं काम केलं आहे’ असे वक्तव्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

महत्वाच्या बातम्या