fbpx

‘कॉंग्रेस सत्तेत आल्यास प्रत्येक गरिबाला मिळणार पगार’

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत जिंकून सत्तेत आल्यास देशातील प्रत्येक गरिबाला किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना राबवली जाईल, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज रायपूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना दिले.देशातील गरिबी दूर करण्यासाठी आणि भूकबळी थांबवण्यासाठी काँग्रेसने किमान उत्पन्नाची हमी देण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. सत्तेत आल्यास हे वचन आम्ही निश्चितपणे पूर्ण करू, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, ‘एक उद्योगपती मित्रांचा आणि दुसरा गरीब शेतकऱ्यांचा, असे दोन भारत बनवण्याचा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डाव आहे.’ असे सांगत राहुल यांनी पुन्हा एकदा राफेलवरून निशाणा साधला. गरिबाने अर्धी भाकरी खाऊन राहावे आणि अनिल अंबानी यांनी जास्तीत जास्त पैसा कमवावा, अशी या सरकारची नियत असून काहीही झाले तरी सरकारचे हे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असे राहुल यांनी ठणकावले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधून लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. रायपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांनी गरिबांसाठी युनिव्हर्सल बेसिक इन्कम लागू करण्याची घोषणा केली आहे. परंतु ही युनिव्हर्सल बेसिक इन्कम योजना म्हणजे नक्की काय आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.