‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला

‘उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे’, भाजपचा टोला

मुंबई : लखीमपूर खेरी प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी ‘सामना’च्या रोखठोक या सदरातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. चार खून पचवून जगातला सर्वात मोठा पक्ष भारतात सुखाने झोपलाय, असा घणाघात राऊत यांनी भाजपवर केला आहे. तसंच, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. प्रियंका गांधी यांच्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अस्तित्व दिसले, असं संजय राऊत म्हणालेत.

यावरून भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला डिवचले आहे. उद्धव ठाकरेंमध्येही अलीकडे राहुल गांधींची झलक दिसू लागली आहे असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?
‘रोखठोक’मध्ये भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले की, खीमपूर खेरी येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले. प्रियंका गांधींना धक्काबुक्की केली व बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले. इंदिरा गांधी यांच्या नातीला, राजीव गांधी यांच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना त्या दिवशी देशाने पाहिले. ‘मला का अडवताय? कोणत्या कलमाखाली अटक करताय?’ या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नव्हती! त्यामुळे प्रियंकांची अटक बेकायदेशीरच ठरते!’

‘प्रियंका गांधींच्या अटकेने व संघर्षाने देश खडबडून जागा झाला. 4 ऑक्टोबरच्या पहाटेचा प्रियंका गांधींचा संघर्ष ज्यांनी पाहिला त्यांना इंदिरा गांधींचे अस्तित्व देशात आहे व ते अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल. रात्रीचा गडद अंधार, त्यात एखाद्या वाघिणीप्रमाणे जंगलात फिरणाऱ्या प्रियंकाच्या साहसाने उत्तर प्रदेश पोलिसांचे धाबे दणाणले होते. त्या दिवशी दिल्लीलाही झोप नसावी व उत्तर प्रदेश प्रशासनाला घाम फुटला असावा’ असे ‘रोखठोक’ सदरात लिहिण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या