‘आता देशाची राजधानी गुजरातला गेली तरी आश्चर्य वाटणार नाही’, काँग्रेसचा भाजपला टोला

nana vs modi

मुंबई : महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. मुंबईचे हे विमानतळ आता पूर्णपणे ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या ताब्यात गेले आहे. त्याबरोबर एएएचएलचे मुख्यालय मुंबईतून हलविण्यात आले आहे.

अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती. सध्या बांधकाम सुरु असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा ताबाही अदानी यांच्या कंपनीकडे गेला आहे. अदानींच्या या निर्णयामुळे एक मोठी कंपनी आता पुन्हा मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट झाली आहे.

या प्रकरणावरून अदानी समूह आणि भाजपवर चहुबाजुंनी टीका होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारचा कारभार पाहता देशाची राजधानी गुजरातला हलवली तरी आश्चर्य वाटायला नको असा टोला पटोलेंना लगावला आहे.

ते म्हणाले, आता देशाची राजधानी पुढील काळात अहमदाबादला गेली तरी हे आपल्यासाठी नाविन्य वाटायला नकोय. कारण आज देशाचे जे राज्यकर्ते आहेत, त्यांची नियत आणि निती याबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण झालेला आहे. असं जरी झाले तरी आश्चर्य वाटायचे काही कारण नाही.

दरम्यान, कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे. मात्र यामागचे खरं कारण हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP