त्या मजुरांच्या मृत्यूनंतरही औरंगाबाद प्रशासनाच्या ‘या’ चुकीमुळे नातेवाईकांना द्यावा लागला लढा!

औरंगाबाद : गतवर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेले मजूर आपल्या गावी पायी परततांना करमाड येथे रेल्वे रुळावर झोपल्यामुळे तब्बल १६ मजुरांना रेल्वने चिरडले होते. यात सर्व १६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या मृतांच्या नातेवाईकांना त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ११ महिन्यांचा लढा द्यावा लागला आहे. मध्यप्रदेश सरकारने औरंगाबाद प्रशासनाशी सतत पाठपुरावा केला होता. मात्र औरंगाबादकडून थंड प्रतिसाद मिळाला. अखेरीस ११ महिन्यांनंतर या नातेवाईकांच्या हातात मृत्यू प्रमाणपत्र पडले.

गतवर्षी झालेल्या या घटनेने देशभर हळहळ व्यक्त झाली होती. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद झाल्याने मध्यप्रदेश राज्यातील असलेले हे मजूर गावी निघाले होते. मात्र औरंगाबादच्या रेल्वे बंद असल्याने भुसावळहून रेल्वे मिळेल, या आशेने पोलिसांचा ससेमिरा चुकवत ७ मे २०२० रोजी पायीच त्यांनी रेल्वे रुळावरून मध्यप्रदेश गाठण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, सतत चालल्याने थकवा आला अणि ते सर्व मजूर रात्री करमाड परिसरात सटाणा परिसरात रेल्वे रुळावर झोपी गेले होते.

मात्र ती रात्र त्यांची अखेरची रात्र ठरली. झोपेत असतानाच रेल्वेने या सर्व मजुरांना क्षणात चिरडून टाकले. दरम्यान, या मृत मजुरांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळावे, यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी प्रयत्न सुरु केले होते. यातही मध्यप्रदेश येथील शहडोलचे जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु केला. मात्र, औरंगाबादेतून प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांना अडथळा येत होता. मृत्यू प्रमाणपत्र मिळत नसल्याने आवश्यक सुविधेपासूनही ते वंचित होते. अखेर ३० मार्चला त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १ एप्रिल रोजी मृतांच्या नातेवाईकांच्या हाती मृत्यू प्रमाणपत्र पडले.

महत्त्वाच्या बातम्या