मूल्यांकनाचे काम ‘रोबोट’द्वारे नाही, तर माणसांद्वारे: मुंबई विद्यापीठ

mumbai-university 00

वेबटीम : विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ सुरूच आहे. विद्यापीठाने परत एकदा निकालासंदर्भात उच्च न्यायालयात नवीन तारीख दिली आहे. १९ सप्टेंबपर्यंत सगळे निकाल जाहीर करण्याचा दावा विद्यापीठाने केला असून त्यांच्या या दाव्याबाबत साशंक असलेल्या न्यायालयाने या तारखेपर्यंत निकाल जाहीर करावेच लागतील, असे विद्यापीठाला बजावत शेवटची संधीच दिली आहे.

मुंबई विद्यापीठ उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन मूल्यांकनामुळे आधीच विलंब झालेले निकाल जाहीर करण्याच्या मुदतवाढीचाही बहुधा विक्रम करणार आहे. मूल्यांकनाचे काम ‘रोबोट’द्वारे नाही, तर माणसांद्वारे केले जाते, असे म्हणत. विद्यापीठाने चोराच्या उलट्या बोंबा मारल्या आहेत. निकाल जाहीर करण्याची नवी तारीख विद्यापीठाने बुधवारी उच्च न्यायालयाला सांगितली. निकाल लागत नसल्यामुळे विद्यार्थांचे भविष्य टांगणीला लागले आहे. मात्र मुंबई विद्यापीठ तारीख पे तारीख देत आहे.
पदवीसाठीच्या विविध अभ्यासक्रमांच्या ४७७ परीक्षा घेण्यात आल्या. त्यातील ४६४ परीक्षांचे निकाल आतापर्यंत जाहीर करण्यात आल्याचा दावाही विद्यापीठाने केला. तर वाणिज्य तसेच अकाऊंट्स आणि अर्थ विषयाचे निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. परंतु बँकिंग आणि विमा विषयाच्या ५ हजार ९३२ विद्यार्थ्यांचे निकाल बुधवार सायंकाळपर्यंत, तर वाणिज्य तसेच अकाऊंट्स आणि अर्थ विषयाच्या ८ हजार १३२ विद्यार्थ्यांचे निकाल १३ सप्टेंबपर्यंत जाहीर करण्यात येऊन या सगळ्या विद्यार्थ्यांना १९ सप्टेंबपर्यंत गुणपत्रिका देण्यात येतील. त्यात मुंबईच्या विद्यार्थ्यांना निकालानंतर दोन दिवसांनी, तर मुंबईबाहेरील विद्यार्थ्यांना १९ सप्टेंबपर्यंत गुणपत्रिका मिळतील. तसेच त्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी अर्ज करावा लागेल, असेही विद्यापीठातर्फे सांगण्यात आले.