गुगलला मोठा धक्का

गुगलला 17 हजार कोटींचा दंड

वेबटीम : अवैध रुपाने आपल्याच शॉपिंग सेवेला प्राधान्य दिल्याने गुगलची पालक कंपनी अल्फाबेटला  युरोपियन महासंघाच्या नियामक समितीने 17 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचप्रमाणे गुगलला प्रतिस्पर्धी विरोधी कृती 90 दिवसांच्या आत थांबविण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, मुदतीमध्ये हे न केल्यास आपल्या प्रतिदिनाच्या उलाढालीच्या 5 टक्के दंडाचा सामना करावा लागणार आहे.  युरोपियन महासंघाच्या नियामक समितीच्या निर्णयाने गुगलला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. 

इंटरनेटवर कोणतीही गोष्ट शोधण्यासाठी सध्या गुगलचा सर्रासपणे वापर केला जातो. मात्र गेल्या काही वर्षात स्वतःची उत्पादने आणि सेवांना प्राधान्य देण्यासाठी सर्च इंजिनमध्ये गुगलने फेरफार केल्याचे समोर आले आहे. यामुळे गुगलकडून सर्च इंजिनमध्ये इतर उत्पादनांची माहिती लपवित स्वतःची उत्पादने आणि सेवांना प्राधान्य दिले जाते. कंपनीच्या या कृत्यामुळे युरोपियन महासंघाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

इतर कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये नवीनता आणि गुणवत्ता असूनही गुगलच्या या कृतीमुळे ती डावलण्यात येते. ग्राहकांना फायदेशीर आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निवड करण्यास बाधा निर्माण होते, असे समितीच्या आयुक्त मार्गारेट वेस्तागेयर यांनी म्हटले. गुगलच्या प्रतिस्पर्धी असणाऱया अमेरिकेच्या येल्प, ट्रिप ऍडवायजर, ब्रिटनच्या फाउंडेम, न्यूज कॉर्प आणि  फेयर सर्च यासारख्या कंपन्यांनी तक्रार केली होती. गुगलविरोधात गेली सात वर्षे तपास चालू होता. यानंतर ही कारवाई करण्यात आली.