हिंगोली : वसमत येथील युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून मयत शेतकऱ्याच्या नावावर पीककर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात युनियन बँक व्यवस्थापक, तलाठी, मंडळ अधिकारी, दुय्यम निबंधक यांच्यासह १३ जण आरोपी आहेत.
वसमत तालुक्यातील चोंडी तर्फे सेंदुरसना येथील कणीराम नामदेव राठोड हे ४ जून २००५ रोजी मयत झाले आहेत. मात्र त्यांच्या नावावर १९ नोव्हेंबर २०१८ रोजी युनियन बँकेतून कर्ज उचलल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सातबारावर कर्जाचा बोजाही टाकण्यात आला.
याप्रकरणी वसमत येथील म. नदाफ बशीर खान यांनी संबंधिताची माहिती घेतली असता मयताच्या नावाने परस्पर बँकेत खाते उघडण्यात आले. मयताचे आधारकार्ड, पॅनकार्ड ही बनावट काढण्यात आले. या माहितीच्या आधारे युनियन बँकेच्या व्यवस्थापकाने १ लाख ५ हजारांचे कर्ज दिले असल्याचे समोर आले. याप्रकरणी तक्रार दिली मात्र पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ सुरू केली होती. मात्र तक्रारदाराने पाठपुरावा सुरूच ठेवल्याने अखेर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. विशेष म्हणजे मृत शेतकऱ्याच्या मुलानाही याबाबत माहिती नव्हती.
याप्रकरणी वसमत युनियन बँकेचे व्यवस्थापक, बँकेचे कर्ज वितरण व्यवस्थापक, रोखपाल, बँक खाते तपासणीस, खाते उघडण्याचे दोन साक्षीदार, मुद्रांक विक्रेता, चोंढी तर्फे सेंदुरसनाचे तलाठी वाघीले, मंडळ अधिकारी अंभोरे, दुय्यम निबंधक नोंदणी अधिकारी डफडे, बनावट आधारकार्ड तयार करुन देणारे व्यक्ती, बनावट पॅनकार्ड तयार करणारे व्यक्ती अशा १३ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- कोणत्याही समितीच्या समोर आमचे मुद्दे अजिबात मांडणार नाही : संयुक्त किसान मोर्चा
- ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा : चंद्रकांत खैरे
- गडकरींच्या आरोपानंतर सिमेंट उद्योग आणि बिल्डर्समध्ये सुरु झाले आरोप-प्रत्यारोप…
- १७ दिवसांनी देशात परतल्यानंतर राहुल गांधींचा तामीळनाडु दौरा…
- कौतुक तर होणारच ! पुण्यातील ‘अरिष्टी’ या स्टार्टअपचं राष्ट्रीय स्तरावर यश