सोयगावात होणार पंचायत समितीची सुसज्ज प्रशासकीय इमारत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय!

abdul sattar

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव पंचायत समितीची प्रशासकीय इमारत जीर्ण अवस्थेत आहे. येथे सर्व सुविधेने सुसज्ज नवीन इमारत उभारण्यासाठी राज्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत होते. बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोयगाव पंचायत समितीच्या इमारतीसाठी साडेसात कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. त्यामुळे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

तालुक्याचा कारभार पंचायत समितीमधून चालतो. सोयगाव पंचायत समितीच्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्या ठिकाणी एक चांगली व सर्व सुविधा युक्त सुसज्ज अशी इमारत उभी राहावी यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळोवेळी शासनास पाठपुरावा केला. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अखेर सोयगाव पंचायत समिती इमारतीच्या निधीला मंजुरी दिली. त्यामुळे सत्तार यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या बैठकीला नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेंद्र कुमार तसेच औरंगाबाद जिल्हा परिषदेचे सभापती राजू राठोड उपस्थित होते.

कर्मचार्‍यांनाही मिळणार लवकरच निवासस्थान

सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधी मंजूर करावा अशी विनंती राज्यमंत्री सत्तार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बैठकीत केली. त्यावर निवासस्थानाच्या बांधकामासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी तत्वतः मंजुरी दिली. तसेच मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी लवकरच निधी देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

महत्त्वाच्या बातम्या