ना बाळासाहेब, ना उद्धव ठाकरे ‘हे’ आहेत आदित्य ठाकरेंचे राजकीय आदर्श…

blank

मुंबई : महाराष्ट्रात अनेक तरुणांचा राजकीय आदर्श कोण अस विचारल तर बहुतांश तरुण एक तर शरद पवार सांगतात नाहीतर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे पण बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे राजकीय आदर्श मात्र ना बाळासाहेब ठाकरे आहेत ना उद्धव ठाकरे. दादरच्या शिवाजी मंदिर येथे महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा झाली. त्या कार्यशाळेत मुख्याध्यापकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी आपले राजकीय आदर्श कोण आहेत याचा खुलासा केला आहे.

‘ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर हे माझे राजकीय आदर्श आहेत. त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. तसंच, आपणही दिलं पाहिजे,’ असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी टोनी ब्लेअर यांच्याशी भेटीचा एक किस्सा सांगितला. ‘ब्लेअर यांना भेटल्यानंतर त्यांना मी त्यांच्या आयुष्यातील टॉप टेन प्राधान्यक्रम कोणते, असा प्रश्न विचारला होता. त्यावर शिक्षण, शिक्षण, शिक्षण असं उत्तर त्यांनी दिलं होतं. मला त्याचं हे उत्तर खूपच भावलं. राजकीय क्षेत्रात काम करताना त्यांचे शिक्षणाबद्दलचे विचार मार्गदर्शक ठरतात,’ असं आदित्य म्हणाले.

‘महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. या शाळांतील निकाल १०० टक्के लागावे हे आमचं मिशन असल्याचं त्यांनी जाहीर केलं. ‘महापालिका शाळांमध्ये परदेशी भाषा शिकवल्या जातील. या शाळांमध्ये शिकलेला विद्यार्थी जगात अव्वल ठरायला हवा. आपल्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांग लागायला हवी. तिथं प्रवेशासाठी लोकांनी आमच्याकडं शिफारशींची मागणी करण्याची वेळ यायला हवी. त्यासाठी आपणही प्रयत्नशील राहिलं पाहिजे. पालिका शाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची जाहिरात केली जायला हवी,’ अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.