विद्यापीठ शिक्षणासोबतच उद्योजक व कौशल्य विकास केंद्राची स्थापना करणार

Graduation classes at the university will begin on February 15

औरंगाबाद :  ‘उद्योजकता व कौशल्य विकास केंद्र’ महिनाभरात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. या माध्यमातून ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉनिसबिलीटी‘ (सीएसआर) अंतर्गत दीड कोटीचा निधी प्राप्त होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी आवश्यक कुशल व तांत्रिक ज्ञान प्राप्त मनुष्यबळ पुरवण्यासाठी याचा उपयोग करण्यात येणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाच्या वतीने कौशल्य विकासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात अशा प्रकारच्या कोर्सेससाठी एक कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठात ‘उद्योजकता व कौशल्य विकास केंद्र’ (Entreprenership & Skill Development Center) सुरु करण्यासंदर्भातील प्रस्ताव औरंगाबाद इलेक्र्टिकल्स यांना देण्यात आला होता. या कंपनीचे उपाध्यक्ष सोमेन मुजुमदार यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची २८ एप्रिल रोजी बैठक घेवून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

या कंपनीच्या शिष्टमंडळाची कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सकाळी बैठक होऊन हा महत्वपूर्ण निर्णय मान्य करण्यात आल्याचे कंपनी सचिव शैलेश गायकवाड यांच्या स्वाक्षरीचे पत्र दिले. यावेळी औरंगाबाद इलेक्ट्रीकल्सचे उपाध्यक्ष सोमेन मुजुमदार, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, व्ही. एन. पॉल यांची उपस्थिती होती. या दोन्ही संस्थांमध्ये लवकरच सामंजस्य करार होणार आहे. पाहिल्यावर्षी ८० लाख तर पुढे २ वर्षे प्रत्येकी ३५ लाख कंपनीतर्फे देण्यात येणार आहेत.

विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थ्यांना नियमीत पदवी सोबतच ‘स्किल बेस्ड कोर्स‘ प्रमाणपत्र, प्रशिक्षण देण्याबाबतचे प्रयत्न विद्यापीठाकडून  करणे सुरु आहे. या अंतर्गत दोन महिन्यात कार्यान्वित होणार आहे. विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने हे केंद्र महत्वाचे ठरणार आहे. आजच कुलगुरू व कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केंद्रासाठी इमारतींची पाहणी देखील या वेळी करण्यात आली.