सनी लिओनीच्या कार्यक्रमाला कर्नाटक रक्षना वेदिकेचा विरोध

बेंगळुरू : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी बेंगळुरूत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी उपस्थित राहणार आहे. मात्र, तिच्या उपस्थितीवर कन्नड समर्थक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी सनीचे फोटो जाळून जोरदार निदर्शने केली.

कर्नाटक रक्षना वेदिके (KRV) ने सनी लिओनी आणि नववर्षाच्या निमित्ताने बंगळुरूमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमाविरोधात रस्त्यावर विरोध प्रदर्शन केलं. तसेच यामध्ये सनीचे काही फोटोही जाळण्यात आले. हा कार्यक्रम म्हणजे संस्कृतीवर हल्ला असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे आणि म्हणूनच अशाप्रकारे नवीन वर्षाचं स्वागत केलं जाऊ शकत नसल्याचं संघटनेने म्हटलं आहे. सनी लिओनीचा हा विशेष कार्यक्रम रद्द करण्यात यावा अशी देखील या संघटनेची मागणी आहे. नववर्षाच्या निमित्ताने एका मोठ्या जाहिरात कंपनीच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बंगळुरूच्या मोठ्या हॉटेलमध्ये होणाऱ्या या विशेष कार्यक्रमाच्या तिकिटाची विक्रीही सुरू झाली आहे.