समाज जोडण्याचा एल्गार करा; तोडण्यासाठी करू नका – रामदास आठवले

कायद्यापेक्षा कोणीही मोठ नाही ; रामदास आठवले

मुंबई : भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी जनतेवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या कारस्थानामागे कोणीही असो त्यांचा शोध घेऊन कारवाई झाली पाहिजे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही असे सांगत पुण्यात शनिवारवाड्यावर झालेल्या एल्गार परिषदेचा धागा पकडत समाज तोडण्यासाठी नव्हे तर समाज जोडण्यासाठी एल्गार पुकारावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केेले. ते म्हणाले की, भीमा कोरेगाव येथे निरपराध आंबेडकरी जनतेवर हल्ला झाल्यानंतर त्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आंबेडकरी जनतेच्या एकजुटीतून महाराष्ट्र बंदचे आंदोलन यशस्वी झाले. त्यात सर्वच गटांचे कार्यकर्ते होते. आमचे रिपब्लिकन कार्यकर्तेही आघाडीवर होते. या आंदोलनातुन समाजाच्या ऐक्याची ताकद समोर आल्याने सुरू झालेल्या रिपब्लिकन ऐक्याच्या मागणीला आपला सदैव पाठिंबा आहे. मात्र ऐक्य हे केवळ चार गटांचे नसावे. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सर्व गटांचे ऐक्य व्हावे. आता समाजात प्रकाश आंबेडकरांचे नाव मोठया प्रमाणात पुढे आले आहे. त्यामुळे त्यांनी ऐक्यात मोठी भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.