१५ सप्टेंबर – ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ स्पेशल

Mokshagundam Visvesvaraya

अपूर्व कुलकर्णी; शिक्षकदिन, बालदिन, पर्यावरण दिन हे दिवस आपल्याला माहित आहेतच. त्या त्या दिवशी ते दिवस आपण साजरेही करतो. असाच १५ सप्टेंबर हाही एक दिवस. या दिवसाचं महत्त्व जाणणारे जाणकार क्वचितच सापडतील. भारतातील महान स्थापत्य अभियंते ‘सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या’ यांचा हा जन्मदिवस. म्हणून हा दिवस भारतभर ‘ राष्ट्रीय अभियंता दिन’ म्हणून साजरा होतो.

Loading...

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील ‘मुद्देनहळ्ळी’ या गावात झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुणे येथील ‘ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग’ मध्ये ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ विभागात शिक्षण घेतले. येथूनच त्यांनी १८८३ मध्ये अभियांत्रिकी पदवी संपादन केली.

पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या ज्ञानाचा समाजहितासाठी वापर करताना सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांनी दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांच्या अनेक योजना सफल केल्या. त्यांनी ‘स्वयंचलित पूरनियंत्रण द्वार प्रणाली’ (Automatic Flood Control Door System) विकसित केली आणि त्याचे पेटंटही मिळवले. या प्रणालीचा पहिला उपयोग १९०३ साली पुण्याजवळील खडकवासला धरणास करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला. एवढेच नव्हे तर आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध ‘तिरुमाला-तिरुपती’ येथील रस्तेबांधणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते. अनेक वर्षे त्यांनी म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणूनही कार्य केले. तेथे त्यांची ओळख ‘म्हैसूर राज्याचे पिता’ अशी होती. याचवरून त्यांच्या कार्याची महानता स्पष्ट होते.

त्यांच्या कार्याची दखल घेत लंडन येथील ‘ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स’ने त्यांना सन्माननीय सदस्यत्व दिले होते. तसेच बेंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चीही फेलोशिप त्यांना मिळाली होती. १९१७ मध्ये त्यांनी बेंगलोर येथील ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया’ची स्थापना केली तसेच १९२३च्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’चे ते अध्यक्ष होते.या थोर अभियंत्याने इतरही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. त्याबद्दल ब्रिटिश सरकारनेदेखील त्यांचा "Knight Commander Of The Order Of The Indian Empire" हे पदक देऊन गौरव केला. स्वातंत्र्यानंतर १९५५ साली त्यांचा ‘भारतरत्न’ या देशातल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यांच्या अपूर्व अशा देशकार्याचा हा सन्मान होता.
या थोर अभियंत्याने १४ एप्रिल १९६२ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशात अनेक शास्त्रज्ञ अभियंते तयार व्हावेत आणि त्यातून देशाची प्रगती व्हावी या हेतूने १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ म्हणून घोषित केला गेला. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या प्रेरणेतून अनेक समाजसेवी अभियंते घडो या सदिच्छेसह सर्वांना ‘राष्ट्रीय अभियंता दिनाच्या’ शुभेच्छा!!!Loading…


Loading…

Loading...