fbpx

जेवणात रक्ताने माखलेला कापसाचा बोळा आढळल्याप्रकरणी जहांगिर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड

पुणे : हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेल्या रुग्णाच्या सुपात रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळून आल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी हडपसर येथील महंमदवाडीचे रहिवासी महेश सातपुते यांनी एफडीएकडे हॉस्पिटल प्रशासन, पोलीस, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. आता जहांगिर हॉस्पिटलला अन्न व औषध प्रशासनाने जहांगिर हॉस्पिटलला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच हॉस्पिटलमधील कँटिनची तपासणी केल्यानंतर आढळून आलेल्या त्रुटी पूर्ततेचा अहवाल सादर करण्यासाठी नोटीस बजावली असून कँटिनमध्ये मे महिन्याअखेरपर्यंत सुधारणा करण्यास सांगितले आहे.

महेश सातपुते यांच्या पत्नी बाळंतपणासाठी जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या, प्रसूतीनंतर काही काळानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्ण महिलेला सूप देण्यात आले होते. यावेळी थोडं सूप पिल्यानंतर रुग्ण महिलेला सुपामध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळून आले. त्यामुळे त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभारामुळे संतप्त झालेल्या महेश सातपुते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती .

सातपुते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर एफडीएच्या अधिका-यांनी कँटीनची तपासणी केली. त्यात रुग्णालयातील कँटिनमध्ये अस्वच्छता आढळून आली. कँटिनमध्ये अस्वच्छता असल्यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस.काकडे यांनी एफडीएचे पुणे विभागीय सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्याकडे हॉस्पिटल विरोधात खटला दाखल केला. बुधवारी हॉस्पिटल प्रशासनाला बाजू मांडण्यासाठी संधी देण्यात आली होती. देशमुख यांनी एफडीएच्या अधिका-यांचे आणि हॉस्पिटलचे म्हणणे ऐकूण घेतल्यावर हॉस्पिटला एक लाख रुपये दंड केला,असे एफडीएच्या सहायक आयुक्त ए.ए.भोईटे यांनी सांगितले.