राम मंदिराच्या उत्तरावरून विहिंप भडकली ; मोदींना दिला निर्वाणीचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये संसदेत विधेयक आणून राम मंदिराच्या उभारणीचा पर्याय फेटाळून लावला आहे. न्यायालयाद्वारेच हा प्रश्न सोडवण्यावर आपला भर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राम मंदिराच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या भाजपने आणि खासकरून नरेंद्र मोदी यांनी या मुद्दावरून फसवणूक केल्याची भावना हिंदुत्ववादी संघटनांमध्ये प्रबळ होत चालली आहे. याच मुद्दावरून विश्व हिंदू परिषदेने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारला पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे.

राम मंदिराचा मुद्दा न्यायालयावर न सोडता संसदेत विधेयक आणून मंदिर निर्माणाचा मार्ग खुला करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी केली आहे. या मुद्दावर पुढची भूमिका काय असेल हे ठरवण्यासाठी ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला प्रयागराज इथे धर्मसंसद आयोजित करण्यात आली आहे. या धर्मसंसदेमध्ये संत-महंत पुढील दिशा स्पष्ट करतील असं आलोक कुमार यांनी सांगितलं आहे.