कर्मचारी संघटना वेतनवाढीच्या प्रस्तावानंतरही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम!

कर्मचारी संघटना वेतनवाढीच्या प्रस्तावानंतरही विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम!

अनिल परब

मुंबई : राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप जवळपास महिनाभरापासून सुरुच आहे. एसटीचे सरकारमध्ये विलिनिकरण करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. याप्रकरणी काल आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यासह सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab), एसटीचे अधिकारी, एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बुधवारी बैठक झाली.

या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची घोषणा अनिल परब यांनी केली. शासनाने नेमलेली समिती विलीनीकरणाबाबत निर्णय घेणार असून, कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे परब यांनी जाहीर केले. मात्र शासनाच्या या निर्णयानंतर देखील एसटी कर्मचारी संघटनांचे समाधान झालेले नाही. या संघटना विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारच्या निर्णयाबाबत चर्चा करून गुरुवारी संपाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

परबांचे कर्मचाऱ्यांना आवाहन
निलंबित केलेले संपकरी कर्मचारी कामावर हजर झाल्यास निलंबन रद्द केले जाईल. ते हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून कामावर हजर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.संपामुळे होणारे नुकसान एसटीला व कामगारांनाही परवडणारे नाही. संप मागे घेतला नाही तर कठोर कारवाई करण्याचा इशाराही परब यांनी दिला.

असे असणार वेतनवाढ

१. एक ते दहा वर्षे सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपये वाढ होईल. ज्यांचे मूळ वेतन १२ हजार ८० रुपये होते ते आता १७ हजारांहून अधिक होईल. इतर भत्त्यांसह त्यांच्या एकूण वेतनात ७ हजार २०० रुपये वाढ होणार असून, त्यांचे पूर्ण वेतन १७ हजार ८० रुपयांवरून २४ हजार ५०० रुपये होईल.

२. दहा ते २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी ४ हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १६ हजार रुपये असलेले मूळ वेतन २३ हजार ४० रुपये होईल. इतर भत्त्यांसह त्यांच्या एकूण वेतनात ५ हजार ७६० रुपये वाढ होत असून, पूर्ण वेतन २८ हजार ८०० रुपयांपर्यंत जाईल.

३. वीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी २,५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यांसह त्यांच्या एकूण वेतनामध्ये ३,६०० रुपये वाढ होणार आहे. त्यामुळे त्यांचे पूर्ण वेतन ३७ हजारांवरून साधारण ४१ हजार रुपये होईल.

४. तीस वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी २,५०० रुपये वाढ करण्यात आली आहे. इतर भत्त्यांसह त्यांच्या एकूण वेतनामध्ये ३,६०० रुपये वाढ होईल. त्यामुळे त्यांचे पूर्ण वेतन साधारण ५६ हजार रुपये होणार आहे.

महत्वाच्या बातम्या