वसुलीत हलगर्जीपणा करणारा कर्मचारी निलंबित

औरंगाबाद : शहरातील प्रभाग क्रमांक ५ अंतर्गत वसुली कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत असल्याचे निदर्शनास आल्यावर औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी त्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. आज (दि. २१) प्रशासक यांनी नारेगाव मुख्य रस्त्यावर दुकाने व इतर प्रतिष्ठानाना लावण्यात आलेले कर किंवा डिमांड नोटीस बाबत स्वतः विचारणा केली असता त्यांचा निदर्शनास आले की अनेक दुकानांना डिमांड नोटीस देण्यात आलेली नाही. याबाबत माहिती घेऊन प्रशासकांनी जागेवरून संबंधित कर्मचारी प्रभू चव्हाण यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

प्रत्येक वॉर्ड अधिकारी यांनी दररोज किमान दोन तास वसुली पथकासोबत डिमांड वाटप करता वेळ द्यावी, आणि पुढच्या आठवल्यात ज्यांना नोटीस दिली त्यांच्याकडून वसुली करावी. जर कोणी कर भरण्यास टाळाटाळ केली तर त्याच्यावर कारवाई करावी, असे आदेश प्रशासकांनी यावेळी दिले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, वॉर्ड अधिकारी सविता सोनवणे व इतरांची उपस्थिती होती. प्रशासकांनी सिडको बस स्टॅण्डजवळ अक्षयदीप प्लाझा या व्यापारी संकुलाच्या कर वसुलीचा आढावा अक्षयदीप प्लाझा समोर समक्ष त्यांच्या उपस्थितीत घेतला. यावेळी त्यांनी कर वसुलीत हलगर्जीपणा करू नयेत अथवा कारवाई समोर जावे लागेल अशी सक्त ताकीद वॉर्ड अधिकाऱ्यांना आणि वसुली कर्मचाऱ्यांना केली. यावेळी उपआयुक्त तथा कर निर्धारक व संकलक अपर्णा थेटे, वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी व आदींची उपस्थिती होती.

वसुलीत हलगर्जीपणा चालणार नाही

सर्व व्यवसायिक मालमत्ता धारकांना आपल्याशी संबंधित कर भरण्याची पावती किंवा त्यांना मिळालेली डिमांड नोटीस आपल्या प्रतिष्ठानवर ठेवावी. मी कोणत्याही वेळेस पाहणी करणार. जर पाहणीच्या वेळेस संबंधित दुकान मालक किंवा व्यापार्यांकडे पावती किंवा डिमांड नोटीस सापडत नसेल तर त्यांनी कर भरला नाही किंवा त्यांना डिमांड नोटीस मिळाली नाही असे गृहीत धरून पुढची कारवाई करण्यात येईल कर , यापुढे वॉर्ड अधिकाऱ्यांवर देखील जबाबदारी निश्चित केली जाइल.
– आस्तिक कुमार पांडेय ,मनपा आयुक्त

महत्वाच्या बातम्या