लोहगाव विमानतळ जमीन हस्तांतरण संबंधी तातडीची बैठक – अनिल शिरोळे

पुणे : लोहगाव विमानतळ संबंधी राज्य सरकार तर्फे २५ एकर जमीन हस्तांतरण प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री तसेच केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी ह्यांनी राज्य सरकारला ३० जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या पायाभूत समितीच्या बैठकीत दिले होते.

त्यानंतर नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्यात चर्चा झाली असून जागा देण्याचे तत्वत: मान्य करण्यात आल्याची माहिती पुण्याचे खासदार अनिल शिरोळे ह्यांनी आज संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर बोलताना दिली आहे.

तसेच या संबंधी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधिताची बैठक पुणे महापालिका आयुक्त यांनी बोलाविण्याची सुचना देखील गडकरी ह्यांनी केली असून त्यानुसार आज महापालिका आयुक्त कुणाल कुमार ह्यांच्याशी शिरोळे यांनी तातडीने बैठक घेण्यास सांगितले आहे.