एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमा दंगल किंवा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही : आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

मुंबई : एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा दंगल किंवा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही. मात्र तपास यंत्रणांनी कोणत्याही पुराव्यांअभावी तथाकथित पत्रांचा संदर्भ माओवाद्यांशी जोडला आहे. मुळात एल्गार परिषदेच्या नेत्यांकडून जमा केलेल्या लॅपटॉपमधील डाटाही माओवादी किंवा नक्षलवाद्यांकडून आल्याचा पुरावा तपास यंत्रणांकडे नाही. तरीही परिषदेच्या नेत्यांना अडकवण्याचा डाव तपास यंत्रणांनी आखल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर कडाडून टीका केली.

प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे –

  • सरकारकडून देशात दंगली घडवून अराजकता माजवत आणीबाणी आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
  • संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठी एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक केली जात आहे.
  • एकबोटे आणि भिडे यांच्याविरोधात पुरावे नसल्याचे कारण देत क्लीन चिट देणाºया सरकारने एल्गार परिषदेच्या नेत्यांविरोधात कोणते पुरावे मिळाले, ते सादर करण्याची मागणी त्यांनी केली.
  • एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा दंगलीशी काय संबंध आहे? त्याचा खुलासाही सरकारने करण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.
  • हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करण्यात अपयश आल्याने आता सरकार आरक्षणवादी व आरक्षणविरोधी गटांत दंगली घडवू पाहत आहे.