जालन्यात लॉकडाऊन विरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार!

जालना: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतोय, त्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात लावण्यात आलेल्या पंचवीस दिवसाच्या अंशत: लॉकडाऊनला जालना जिल्हा व्यापारी महासंघाने सक्त विरोध केला आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठा असंतोष असल्याचे जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब पा. दानवे, महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल आणि शिवसेना नेते तथा माजीमंत्री अर्जुनराव खोतकर यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी तिन्ही लोकप्रतिनिधींना निवेदनही देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, अत्यावश्यक सेवेची आणि इतर दुकाने सुरू असल्याने खरेदीसाठी ७० ते ७५ टक्के नागरीक बाहेर पडतात, त्यामुळे गर्दी होते, अशा वेळी कोरोनाला कसा अटकाव करणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आतापर्यंतच्या अभ्यासातून असे सिद्ध झालेले आहे की कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव उपाय होऊच शकत नसल्याचे स्पष्ट करून शिष्टमंडळाने सरकारने इतर पर्यायांचा विचार करावा किंवा जनतेस कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा नियमाचे पालन करण्याची सक्ती करावी, शासनाने सध्या केलेल्या अंशत: लॉकडाऊनमुळे एक टक्का देखील कोरोनाची साखळी तुटण्याची कुठलीही शाश्वती नाही मात्र, यामुळे व्यापारी व खाजगी कामगार उध्वस्त होतील, अशी भिती व्यक्त करण्यात आली.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारने शनिवार, रविवार असे दोन दिवस पूर्णतः लॉकडाऊन जाहिर केल्यावर उर्वरीत दिवस सर्व नियम पाळून व्यापाऱ्यांना व्यापार करू द्यायचा होता. अचानक पोलिसांकरवी दुकाने बंद करून गोंधळाची स्थिती निर्माण केली गेल्याने व्यापाऱ्यांसह हातावर पोट असणाऱ्यांचे आणि सराफा व्यवसायातील कारागिरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात सराफा व्यवसायात व्यापारी, कारखानदार आणि सुमारे आठशे कामगारांचा उदरनिर्वाह चालतो.

महत्त्वाच्या बातम्या :