…तर पोलिसांना माझा वकिली हिसका दाखवेन – अॅॅड. प्रकाश आंबेडकर

पुणे: एल्गार परिषदेच्या आयोजनात पी.बी.सावंत आणि कोळसे पाटील हे माजी न्यायमूर्ती होते. परंतु ते माजी न्यायमूर्ती असल्याने पोलीस त्यांना हात लावू शकत नाहीत. मी सामान्य माणूस असल्याने माझ्यावर आरोप होत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मला चौकशीला बोलावले तर पोलिसांना मी नोटीस पाठवेन आणि पोलीस सहआयुक्त रविंद्र कदम यांना तसेच पोलिसांना माझा वकिली हिसका दाखवेन, असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

रविंद्र कदम हे पुणे पोलीस सह आयुक्त आहेत. एल्गार परिषद प्रकरणी अटक केलेल्या पाच संशयित माओवाद्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली आहे.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी चौकशीला बोलावले तर जाणार का? असा प्रश्न आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले आंबेडकर ?

देशभरातील राजकारणी मंडळींना मीच एकत्र आणू शकतो हे भाजपला माहीत असल्याने माझ्यावर कारवाई केली जात आहे. कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. माझ्याविरोधात पुरावा नसल्याने आता पंतप्रधानांना मारणाऱ्यांच्या यादीत माझं नाव टाकलं आहे. एल्गार परिषदेच्या आयोजनात पी.बी.सावंत आणि कोळसे पाटील हे माजी न्यायमूर्ती होते. परंतु ते माजी न्यायमूर्ती असल्याने पोलीस त्यांना हात लावू शकत नाहीत. मी सामान्य माणूस असल्याने माझ्यावर आरोप होत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मला चौकशीला बोलावले तर पोलिसांना मी नोटीस पाठवेन आणि पोलीस सहआयुक्त रविंद्र कदम यांना माझा वकिली हिसका दाखवेन.