सत्तारांचा दानवेंविरोधात एल्गार, आता सेनेचाच खासदार होणार!

abdul sattar

औरंगाबाद – आगामी लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून शिवसेनेचाच खासदार होणार असा दावा शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. सत्तार यांनी हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवेंविरोधात एक प्रकारे एल्गार पुकारल्याचे दिसून आले.

राज्यमंत्री सत्तार हे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी ते हिंगोलीत आले होते. यावेळी आमदार संतोष बांगर, शिवसेनेचे पदाधिकारी राम कदम यांची उपस्थिती होती. सत्तार म्हणाले की, राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी गावपातळीवर जात आहे. त्यातून गावातील समस्या जाणून घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वात जास्त ठिकाणी भाजपा दावा करत आहे. यावर सत्तार म्हणाले, विधान परिषद निवडणुकीच्या वेळीही भाजपने सर्व सहा जागांवर विजय मिळविण्याचा दावा केला होता. मात्र, त्यांना केवळ एकच जागा मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे दावे किती विश्वासाचे आहेत हे स्पष्ट होते. राज्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या 15 टक्के ग्रामपंयतीही त्यांना जिंकता येणार नाहीत. या निवडणुकीच्या मतमोजणी नंतर निवनिर्वाचीत सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा शिवसेनेच्या व्यासपीठावर सत्कार केला जाईल. त्यावेळी शिवसेनेला किती ग्रामपंचायती मिळविता आल्या हे स्पष्टपणे दिसून येईल असेही त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या