अकरावी प्रवेश: ३० हजार ७३४ विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीची वाट पहावी लागणार

11 th class admission_students_pune

पुणे-अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दुसऱ्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी गुरूवारी दुपारी जाहीर करण्यात आली. या गुणवत्ता यादीनुसार २४ हजार ५५३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले असून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना  २१ ते २४ जुलैमध्ये (रविवार वगळून) प्रवेश घ्यायचा आहे.

सध्या अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील ज्यूनियर कॉलेजांमध्ये अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यंदा ९१ हजार ६७० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया घेण्यात येत आहे. अकरावी प्रवेश समितीकडून गुरूवारी दुपारी दीड वाजता दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. दुसऱ्या यादीत कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी एकूण ५५ हजार २८७ विद्यार्थी पात्र ठरले होते.

प्रवेश प्रक्रियेत ६ हजार ८८९ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज मिळाले असल्याने त्यांना प्रवेश घ्यावाच लागणार आहे. प्रवेश फेरीत तब्बल ३० हजार ७३४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याने त्यांना तिसऱ्या फेरीची वाट पाहावी लागणार आहे.

पसंतीक्रमाच्या अर्जात विद्यार्थ्यांना २ ते १० क्रमांकानूसार कॉलेज मिळाले असल्यास ते संबंधित कॉलेजांमध्ये प्रवेश घेऊ शकतात अथवा पुढच्या म्हणजेच तिसऱ्या फेरीची वाट पाहू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत तात्पूर्ते प्रवेश बंद केल्याने विद्यार्थ्यांना शुल्क भरून प्रवेश घ्यायचा आहे. एकदा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांला पुढच्या फेरीत सहभागी होता येणार नाही, असे समितीतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, पहिल्या फेरीतून एकूण २४ हजार ६७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.