भगरीच्या पिठातून अकरा जणांना विषबाधा, दोघे आयसीयूत

उस्मानाबाद : आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास असल्याने काही जणांनी भगर, साबुदाण्याचे मिश्रण असलेल्या पिठाच्या भाकरी खाल्ल्या. पण या पिठामुळे शहरासह ग्रामीण भागातील ११ जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चार कुटुंबांतील सदस्यांना रक्ताच्या उलट्या व अतिसाराचा त्रास सुरू झाला. यामधील आठ जणांवर जिल्हा रुग्णालयात तर एक गरोदर महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त उपवासासाठी अनेकांनी साबुदाणा व भगरमिश्रित तयार केलेले एकाच कंपनीचे पीठ विविध दुकानातून खरेदी केले होते. घरात पिठ शिजवून सेवन केल्यानंतर तीन ते पाच तासांच्या दरम्यान अनेकांना विषबाधेचा त्रास सुरू झाला. यामध्ये जवळपास सर्वांनाच रक्ताच्या उलट्या व अतिसाराचा त्रास सुरू झाला. याची तीव्रता अधिक असल्यामुळे अनेकांना अशक्तपणा येऊन थरथरी सुटून चक्कर आली.

यातील दत्तात्रय भगवान नांदे (३१), पूजा दत्तात्रय नांदे (२१, बोरगाव, राजे, ता. उस्मानाबाद) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांचा चिमुकला देवांश (३) याची प्रकृती स्थिर आहे. विठ्ठलवाडी येथील बालाजी देवराव शिंदे (३१), सरूबाई देवराव शिंदे (६०), किशोर बालाजी पोतदार, बालाजी व्यंकट पोतदार (५०), जयश्री बालाजी पोतदार (३५, रा. उंबरेकोठा) यांच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उस्मानाबाद शहरातच या पिठाचे उत्पादन झाले आहे. उत्पादकाने विविध जिल्ह्यात पीठ पाठवल्याचे समोर आहे. या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासन विभाग चौकशी करत आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP