अनिल देशमुख यांच्या काटोलमधील घरांमधून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त

anil deshmukh

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल तसेच मूळ गाव वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने रविवारी पुन्हा छापे मारले. रविवारी सकाळीच ईडीचे चार जणांचे एक पथक नागपुरात दाखल झाले. त्यांनी थेट देशमुख यांच्या काटोलसह वडविहिरा येथील निवासस्थानांवर छापे मारले.

काटोल तालुक्यातच वडविहिरा या गावी देशमुख यांचे वडिलोपार्जित निवासस्थान आहे. ईडीच्या कारवाईमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काटोल आणि वडविहिरा या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व देशमुख यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. वडविहिरा येथे शेतीची कामे पाहणाऱ्या दिवाणजीला चौकशीसाठी काटोल येथे घेऊन आले.

तपासात अडथळे येऊ नये म्हणून ग्रामीण पोलिस व एसआरपीएफ तैनात होते. यापूर्वीही ईडीने आणि सीबीआयने काटोल तसेच नागपुरातील निवासस्थानी छापे मारून काही दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करून नेले होते. अनिल देशमुख सध्या मुंबईत आहेत. यापूर्वी ईडीने त्यांचे पुत्र सलील व पत्नी आरती यांनाही समन्स बजावले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे. तर आजच्या बाजारभावानुसार या मालमत्तेची किंमत तब्बल 350 कोटी रुपये इतकी असल्याच एका वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांच्या मुलासह पत्नीला देखील ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, यापैकी कोणीही अद्याप ईडी चौकशीसाठी हजर राहिलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IMP