पहिल्या २५ एसी इलेक्ट्रिक बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात समाविष्ट होण्याचा मार्ग मोकळा

PMPML

पुणे : पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा सर्वांत महत्त्वाचा भाग असलेल्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात पहिल्या २५ एसी इलेक्ट्रिक बस समाविष्ट होण्याच्या निविदेस आज मंजुरी देण्यात आली आहे. पुण्याच्या पेठांमध्येही सहज प्रवास करू शकतील अशा ९ मीटरच्या २५ बस भाडेतत्त्वावर घेण्याचे कंत्राट आज देण्यात आले असून १२ मीटर लांबीच्या बसची निविदा प्रक्रियाही काहीच दिवसांत पूर्ण होईल अशी घोषणा पीएमपीएमएलचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक या वेळी उपस्थित होते. या ९ मीटरच्या (३१ सीटर) २५ बस येत्या २६ जानेवारीला पीएमपीएमएलच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. एसी इलेक्ट्रिक बसची सुविधा नागरिकांना नॉन एसी बसच्या दरातच उपलब्ध होणार आहे. या बससाठी भाडेतत्वावर प्रति किलोमीटर ४० रुपये ३२ पैसे असा दर देण्यात आला असून दररोज या बसने २२५ किमीचा प्रवास करणे अपेक्षित आहे. या सर्व बस ‘बीआरटी काँप्लायंट’ आहेत. ओलेक्ट्रा ग्रीनटेक या कंपनीस हे कंत्राट मिळाले आहे. या बसचे चार्जिंग तसेच देखभालीची जबाबदारी कंपनीची राहणार आहे, तर पालिका चार्जिंगसाठी वीज पुरवणार आहे. सुरूवातीला या लहान बस बीआरटी मार्गावरच धावणार असून निगडी ते भेकराईनगर या मार्गावर ही बस धावेल.

सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘‘या बससाठी ४.५ रुपये प्रति किलोमीटर असा नाईट चार्जिंगचा खर्च येणार आहे. तर डे चार्जिंगचा खर्च ६ रुपये प्रति किमी आहे. हे विजेचे शुल्क पालिका भरणार आहे. सध्या सीएनजी नॉन एसी बससाठी प्रत्येक बसला ५४ रुपये ७ पैसे प्रति किमी खर्च येतो. त्यामुळे या बस तुलनेने स्वस्त व पर्यावरणपूरक आहेत. एप्रिलपर्यंत पुढील १२५ बस (१२ मीटर) देखील पीएमपीएमएलच्या ताफ्यात येणार असून त्या नंतरच्या ३५० बससाठी वेगळी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. सार्वजनिक वाहतुक सुविधा पर्यावरणाच्या दृष्टीने हरित व सामान्यांच्या सोईची व्हावी असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृष्टीकोन आहे. त्याच्याशी सुसंगत असाच हा निर्णय आहे.’’