इव्हीएम मशिनबाबत अनेकांच्या मनात संभ्रम, विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी इव्हीएम मशीनचा मुद्दा उचलून धरला असून राज्याची आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. तर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील इव्हीएम बाबत संशय असल्याने विधानसभा निवडणूक ही बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी केली आहे. अजित पवार आज सांगवीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, निवडणुकीतील इव्हीएम मशिनबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. सगळ्यांची वेगवेगळी मते आहेत. लोकसभेला एकतर्फी निकाल लागल्याने संशय वाढला आहे. मशिनमधील चीप बदलली जावू शकते. प्रगत देशात निवडणूका बलेट पेपरवर होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी.

तसेच आपले मत ज्याला दिले आहे, त्यालाच झाले आहे का याची मतदाराला माहिती कळणे आवश्यक आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास लोकांचा गैरसमज दूर होईल. त्यासाठी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास हरकत नाही, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल जेवढा धक्कादायक होता. तेवढाच तो संशयास्पद देखील होता. कारण इव्हीएम बाबत विरोधकांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच आवाज उठावला होता. सत्तेचा वापर करून भाजप पक्ष इव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करू शकतो, असा आरोप विरोधकांकडून वारंवार होत होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत पारदर्शकता येण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदान बॅलेट पेपरवर घ्यावे अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.