करमाळा बाजार समिती निवडणूकीत चुरशीची लढाई; कोण मारणार बाजी ?

गौरव मोरे :  करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगुल वाजला असून, करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. सध्या बाजार समितीवर जगताप-पाटील गटाची सत्ता असून माजी आमदार जयवंतराव जगताप विद्यमान चेअरमन आहेत.

बाजार समिती निवडणूकीत शिवसेनेचे आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार हे एकत्र येऊन तसेच बागल गटाच्या रश्मी बागल आणि जि. प चे अध्यक्ष संजय शिंदे पूर्ण ताकदीने उतरणार असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. कारण बरोबर एक वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे ही बाजार समितीची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पहावयास मिळणार आहे.

बाजार समितीची निवडणूक एकूण १८ जागांसाठी होणार असून १५ गणांचा समावेश करण्यात आला आहे. १५ गण हे शेतकरी मतदार संघातून १५ जागा तर व्यापारी मतदारसंघातून २ तसेच हमाल मतदारसंघातून १ जागेचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रथमच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला असल्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार यात शंकाच नाही. बाजार समिती निवडणूकीसाठी एकूण १ लाख १४ हजार २०३ मतदारांचा समावेश करण्यात आलेला आहे.

बाजार समिती निवडणूकीसाठी करमाळा तालुक्यातील वांगी, केम,कंदर, साडे,उमरड, हिसरे,झरे, जिंती, वाशिंबे, वीट, सावडी,पोथरे, राजूरी, जातेगाव, रावगाव अशा पंधरा गणांचा समावेश करण्यात आलेला आहे. सध्यातरी तालुक्यातील बाजार समितीसाठी स्थानिक पातळीवर निवडणूक होत आहेत. सध्या पाटील गट, बागल गट, जगताप गट, शिंदे गट अशा प्रकारे गटाने निवडणूक लढविली जात आहे.या निवडणूकीत पाटील गट आणि जगताप गट एकत्र येऊन निवडणूक लढविणार असून बागल गट आणि शिंदे गट स्वबळावर लढणार असल्याचे चित्र आहे एकंदरीत ही निवडणूक पारंपारिक पाटील-बागल-जगताप-शिंदे यांच्यात तिरंगी होणार असल्याचं चित्र आहे.

२०१४ विधानसभेच्या निवडणूकीत नारायण पाटील यांनी बाजी मारल्यानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप आणि पाटील गट एकत्र येऊन गेल्या वर्षी झालेल्या करमाळा पंचायत समिती व ४ जिल्हा परिषदेचे गटही ताब्यात घेतलेले आहे याचा फायदा पाटील गट आणि जगताप गट यांना झालेला आहे. राष्ट्रवादीचे नेत्या आणि बागल गटाच्या रश्मी बागल आणि जि. प चे अध्यक्ष संजय शिंदे यांना मागील विधानसभेपासून स्थानिक पातळीवर ही चांगलाच फटका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत बसला होता. याचा फायदा आमदार नारायण पाटील यांना झाला आहे.

जि प चे अध्यक्ष संजय शिंदे आगामी करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्याच्या उद्देशाने तालुक्यातील जि.प व पंचायत समिती निवडणूकीत पूर्ण ताकतीने उतरले होते परंतु त्यांना यश मिळाले नाही. सध्या आगामी विधानसभा निवडणूक कुठल्याही परिस्थिती मध्ये लढविणार असल्यामुळे जि प अध्यक्ष संजय शिंदे संपूर्ण ताकतीने ही निवडणूक लढणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे.

करमाळा बाजार समिती निवडणूकीत आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप हे युती करून तर बागल गटांच्या नेत्या रश्मी बागल,आणि जि.प अध्यक्ष संजय शिंदे हे पूर्ण ताकतीने ही निवडणूक एकमेंकाच्याच विरोधात लढण्याची शक्यता आहे. हे चार ही गटांचे नेते आगामी विधानसभेची तयारी करताणा पाहायला मिळणार आहे.

करमाळ्याच्या राजकारणात ‘यंगब्रिगेड’ सक्रीय

You might also like
Comments
Loading...