भाजप – शिवसेना युती असती तर चित्र वेगळे दिसले असते

सेना-भाजप

मुंबई – भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती झाली असती तर नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत चित्र वेगळेच दिसले असते , अशी प्रतिक्रिया भाजपच्या काही नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली . या नेत्यांच्या मते अनेक प्रभागांमध्ये काँग्रेस उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा भाजप शिवसेना उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज अधिक असल्याचे दिसून येते . मुळात नांदेड शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अत्यंत अल्प आहे. शहरात स्थानिक प्रभावी नेतृत्व नसल्याने या पक्षाला काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना या पक्षांमधील नेत्यांना आपल्या कळपात ओढावे लागले.

भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची सूत्रे कंधारचे शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती . त्यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती . नांदेड शेजारच्या लातूर महापालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला होता . त्याची पुनरावृत्ती नांदेड मध्ये होईल अशी आशा भाजप नेतृत्वाला वाटत होती . मात्र अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्या नेतृत्व शैलीतील फरक भाजप नेतृत्वाला ओळखता आला नाही . अमित देशमुख आणि सर्वसामान्य जनतेचा संपर्क तुटला होता . अमित देशमुखांकडे महापालिका राखण्यासाठी आवश्यक असलेला मुरब्बीपणा नव्हता . या उलट अशोक चव्हाण यांनी गेल्या सात आठ महिन्यांपासून या निवडणुकीची तयारी सुरु केली होती . चव्हाण यांच्याबाबत ते संपर्क ठेवत नाहीत किंवा त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही अशी तक्रार सामान्य माणसाकडून कधीच केली जात नव्हती . मुख्यमंत्री असताना चव्हाण यांनी अनेकांना उपकृत करून ठेवले आहे. त्याची परतफेड या निवडणुकीत त्यांनी सव्याज करून घेतली .

२०१६ च्या उन्हाळ्यात लातूर शहराला भीषण पाणी टंचाई जाणवत होती . त्यावेळी केंद्र सरकारने लातूरला रेल्वे द्वारे पाणी पुरवले होते . ही बाब लातूरकर विसरले नव्हते . असे कोणत्याही प्रकारचे उल्लेखनीय काम नांदेड साठी गेल्या ३ वर्षांत झाले नव्हते , हेही भाजपच्या पराभवाचे आणखी एक कारण सांगता येईल . भाजपकडून अशोक चव्हाण यांना प्रचारात वैयक्तिकरित्या लक्ष्य केले गेले . त्याचाही फटका भाजपला बसल्याचे सांगितले जाते . एम आय एम कडून निराशा झालेले मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळल्याने भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले . नांदेड शहरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आहे. गेली अनेक वर्षे नांदेड शहरातून शिवसेनेचा आमदार निवडून येत आहे . मात्र शिवसेनेनं आपल्या विजयाऐवजी भाजपचा पराभव कसा होईल याचीच काळजी घेतली . त्याचाही फायदा काँग्रेसला झाल्याचे बोलले जात आहे .

Loading...