रावसाहेब दानवेंना निवडणूक आयोगाची नोटीस

नगरपालिका निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पैठणमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची सभा झाली. या सभेवेळी रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.पैठणमधील प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा.”, असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं.

वादग्रस्त वक्तव्य अंगाशी येताच दानवे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ‘आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. ‘आपण लक्ष्मीचे स्वागत करा, असे म्हटले आहे. स्वीकारा असे म्हटलेले नाही,’ असे प्रचारसभेनंतर दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

काय म्हणाले दानवे-: “आज 17 तारीख आहे..आणि उद्या 18 ला मतदान आहे. तुम्हा सगळ्यांना घरी जाण्याची घाई झाली आहे. तुम्हाला माहिती असेल निवडणुकीमध्ये मतदानाच्या आदली रात्र महत्वाची असते. कदाचित अचानक पणे लक्ष्मीचं दर्शन होतं असतं. त्यामुळे अशी लक्ष्मी आली तर तिला परत करू नका, तिचं स्वागत करा. पण मतदानाचा निर्धार केलाय तो कायम ठेवा. कमळ या निशाणीला मतदान करा आणि भाजपचे उमेदवार सुरेश लोळगे यांना विजयी करा”