ठाण्यातील वाहतूक कोंडीची एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल; अधिकाऱ्यांबरोबर तातडीची बैठक

ठाण्यातील वाहतूक कोंडीची एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल; अधिकाऱ्यांबरोबर तातडीची बैठक

eknath shinde

ठाणे : ठाणे शहरातील मुख्य महामार्ग व घोडबंदर रस्त्यावर सोमवारी पुन्हा झालेल्या वाहतूक कोंडीची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेतली आणि अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉटच्या जागा निश्चित करण्याचे आदेश दिले. शिंदे बुधवारी स्वतः नवी मुंबई, खारेगाव, शहापूर आणि दापचारी येथील मोकळ्या जागांची पाहणी करणार आहेत.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे, शहरात चालू असलेली विकासकामे यामुळे या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई –अहमदाबाद रस्त्यावरील वर्सोवे पूल आणि मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम चालू असल्याने बरीचशी अवजड वाहने ठाणे मार्गे पुढे जात होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूककोंडी होऊन त्यात नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागत होते.

त्यातच सोमवारी मध्यरात्री टँकर उलटल्यामुळे पुन्हा एकदा घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तातडीने ठाणे पोलीस, वाहतूक पोलीस, ग्रामीण पोलीस, ठाणे महापालिका आदी यंत्रणांची बैठक घेतली. या बैठकीस ठाणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनय राठोड, मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामदास शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रोडवर गायमुख येथे तेल वाहून नेणारा टँकर उलटल्यामुळे सोमवारी वाहतूक कोंडी झाल्याचे आजच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत अवजड वाहने शहराच्या बाहेर पार्किंग लॉट तयार करून तिथे अडवून टप्प्या-टप्प्याने पुढे सोडण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार, बुधवारी या जागांची पालकमंत्री श्री. शिंदे पाहणी करणार आहेत.

जेएनपीटीतून निघणारी वाहने जेएनपीटीच्या शेजारील पार्किंग लॉटमध्ये थांबवण्यात येणार आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिकवरून मुंबईकडे येणारी वाहने थांबवण्यासाठी खर्डी-सोनाळे-दापोडे येथे, अहमदाबाद येथून मुंबईत येणारी वाहने दापचारी येथे तर ठाणे शहरात येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यासाठी खारेगाव टोल नाक्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग लॉट तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी अवजड वाहने रोखून वाहतूक विभागाच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या टप्याटप्याने ही वाहने शहरात सोडण्यात येतील, जेणेकरून वाहतुकीचे नियोजन करणे शक्य होईल.

पालकमंत्री शिंदे हे स्वतः या नियोजित पार्किंग लॉटच्या जागांची पहाणी करणार असून त्यानंतर या पार्किंगच्या जागावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.ठाणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हे नियोजन असेल. त्यामुळे ठाणे शहरावर अवजड वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या