…तर एकनाथ शिंदेसुध्दा मुख्यमंत्री होतील – मनोहर जोशी

टीम महाराष्ट्र देशा : एक सामान्य कार्यकर्ता कसा मोठा होऊ शकतो हे एकनाथ शिंदे यांचा प्रवास पाहिल्यानंतरही स्पष्ट होते. त्यामुळेच शिवसेना नेते हे मानाचे पद तुम्हाला मिळाले आहे. आता यापुढेही प्रयत्न करीत रहा. जिद्द सोडू नका. एक दिवस तुम्हीसुध्दा मुख्यमंत्री व्हाल’, अशा शब्दांत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शिंदे यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याहस्ते त्यांचा नागरी सत्कार झाला. ठाण्यातील आर्य क्रीडा मंडळाच्या मैदानात झालेल्या या सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर जोशी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या.

मी आज जो कुणी आहे तो केवळ कार्यकर्त्यांमुळेच आहे. कार्यकर्ते हेच माझे बळ असून मी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करत असतो. मी मंत्री आहे, नेता आहे असे जेव्हा माझ्या मनात येईल, तेव्हा मी कार्यकर्त्यापासून लांब गेलो असेन, असे प्रतिपादन शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.